Viral video Of Desi Jugaad: जुन्या घरातून नवीन घरात स्थलांतर करताना किंवा घर बांधताना जुन्या घरातील प्रत्येक वस्तू व्यवस्थित पॅक करून, टेम्पोत भरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावी लागते. आपण चाळीत किंवा तळमजल्यावर राहत असू, तर सामान टेम्पोत ठेवणे सोपे जाते. पण, जर आपण बिल्डिंगच्या तिसऱ्या वा चौथ्या मजल्यावर राहत असू; तर एकेक करून सामान घेऊन जाण्यात बराच वेळ लागू शकतो. तर त्यावर उपाय म्हणून की काय एका व्यक्तीने अजब उपाय शोधून काढला आहे (Viral Video). त्याने सामान घरापासून थेट टेम्पोपर्यंत पोहोचवले आहे.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video) नेमका कुठला आहे हे कळू शकलेले नाही. पण, एक व्यक्ती घराच्या बाल्कनीमध्ये उभी आहे आणि बिल्डिंगखाली टेम्पो उभा आहे. घराच्या बाल्कनीपासून ते टेम्पोपर्यंत एक लांबलचक, मजबूत, कापड लावण्यात आले आहे. घराच्या बाल्कनीमध्ये उभी असलेली व्यक्ती त्या लांबलचक कापडावरून एक बॉक्स सोडते. या कापडावरून सरकत सरकत बॉक्स थेट टेम्पोच्या आत जाऊन पोहोचतो. तर कशा प्रकारे हा जुगाड करण्यात आला आहे ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सामान काही मिनिटांत टेम्पोत भरले जाईल
व्हायरल व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहिलं असेल की, सामान टेम्पोमध्ये भरण्यासाठी व्यक्तीने अजब जुगाड शोधून काढला आहे; जेणेकरून त्याचा वेळ अन् शारीरिक ताकद वाचेल, कमी मनुष्यबळ लागेल आणि सामानही काही मिनिटांत टेम्पोत भरले जाईल. पण, हा जुगाड फक्त हलक्या वस्तूंचे स्थलांतर करण्यासाठी करू शकतो. कारण- एवढ्या उंचावरून काचेच्या किंवा जड वस्तू आपण लांबलचक कापडाद्वारे टेम्पोपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यामुळे भरपूर नुकसान होऊ शकते. पण, हलक्या वस्तूंसाठी हा जुगाड खूपच उपयोगी आहे हे नाकारून चालणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @adultcasmofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओतील अनोखा जुगाड पाहून इम्प्रेस झाले आहेत आणि टाळ्या वाजविण्याच्या इमोजीसह जुगाड शोधणाऱ्याचे कौतुक करताना दिसत आहेत. पण, एका युजरने कमेंट केली आहे, “बरं हुशार; पण माझ्याकडे २०० मीटर लांब कापड नसल्यामुळे मला वाटतं की, मला जुन्या पद्धतीनं म्हणजेच लिफ्टनं किंवा शिड्या उतरूनच सामान टेम्पोत नेऊन ठेवावं लागेल” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.