Viral Video Of Disabled Man : कला ही माणसाला ताठ मानेने जगायला शिकवते. तसेच कलेचे वेड माणसाला आपले वयदेखील विसरायला भाग पाडते. त्यातल्या त्यात चित्रकला ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. शालेय जीवनापासूनच चित्रकला या विषयाची आपल्याला ओळख झालेली असते, तर मोठे झाल्यावर काही जण या कलेचे व्यवसायात रूपांतर करून स्केच आर्टिस्टसुद्धा बनतात; तर आज कलेचे महत्त्व काय असते हे सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जे पाहून नेटकरीसुद्धा भारावून गेले आहेत.
अपंगत्व आल्यानंतर जीवन कसे होऊन जाते याची जाणीव त्याच व्यक्तीला सगळ्यात जास्त असते, ज्याच्यावर ही वेळ आलेली आहे. कृत्रिम अवयव बसवण्यासाठी सर्वसामान्यांना लाखो रुपयांची आर्थिक तरतूद करावी लागते. या उपचारादरम्यान अनेकांचे मन खचून जाते. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने दुःख विसरायला आपल्या कलेची मदत घेतली आहे. एक अज्ञात व्यक्ती कुबड्या बाजूला ठेवून रस्त्याकडेला चित्र रेखाटताना दिसतो आहे. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
स्वतःच्या पायावर उभं राहायला बळ देणारी कला
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, जय टॉकीज चौक, पुणे येथे तर कधी फर्ग्युसन रस्त्यावर ही अज्ञात व्यक्ती चित्र रेखाटते. कुबड्या बाजूला ठेवून, परिस्थितीला न कोसता आपली कला जोपासण्यात ही व्यक्ती मग्न आहे आणि तिने अनेक प्रकारचे स्केच काढलेले दिसत आहेत. हे एका अज्ञात मुलीने पाहिले आणि तिने या गोष्टीचा एक व्हिडीओ तिच्या फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतला आणि शेअर केला आहे. एकूणच कला ही मानवाला जगायला शिकवते, हसायला शिकवते आणि वेळीच रडायला शिकवते. अर्थात, माणूस म्हणून जगायचे कसे हा पाठ आयुष्याच्या कार्यशाळेत कलाच शिकवते.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mee__pooja या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘माणसाला जगायला, लढायला आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहायला बळ देणारी एकमेव गोष्ट – ‘कला’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून ‘हे कलाकार कुठे भेटतील, चित्रकार त्याच्या अंत:करणातून चित्र रेखाटत असतो, ज्यांच्याकडे कला आहे तो कधीच उपाशी नाही राहत’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.