Video Shows former students celebrate reunion uniquely : शाळा ही प्रत्येकाच्या जीवनातील एक खास गोष्ट आहे. जिथे काही जिवलग मित्रच नव्हे, तर आयुष्याचा अर्थ सांगणारे शिक्षकसुद्धा भेटतात. शाळा सोडून बाहेर पडल्यानंतर या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी अनेकदा शाळेत जातात, तेथील शिक्षकांना भेटतात. आज सोशल मीडियावर यासंबंधीचाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही माजी विद्यार्थी त्यांच्या मुख्याध्यापकांना भेटायला गेले आहेत; ज्या मुख्याध्यापकांकडून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने छडीचा मारदेखील खाल्ला आहे.
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे ते माहीत नाही; पण या माजी विद्यार्थ्यांना शाळा सोडून अनेक वर्षे झाले आहेत. त्यातील काही विद्यार्थी पोलीस अधिकारी, तर काही डॉक्टर, वकील, शिक्षक आणि काही जण उद्योगपतीही आहेत. हे सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र येऊन, त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटायला गेले आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांची ही भेट आणखीन खास करण्याचा प्रयत्न केला. ते सगळे जण पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट व पँट घालून आणि पाठीवर दप्तर घेऊन त्यांच्या शिक्षकाकडे गेले आहेत. तुम्हीसुद्धा पाहा हे खास रियुनियन…
व्हिडीओ नक्की बघा…
माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विद्यार्थ्यांनी शाळेच्या गणवेशासारखा पोशाख घातला आहे. त्यानंतर ते पाठीवर दप्तर घेऊन मुख्याध्यापकांसमोर उभे राहिले आहेत. एकेक करून प्रत्येक माजी विद्यार्थी मुख्याध्यापकांसमोर हजर झाला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी एकेक करून प्रत्येक विद्यार्थ्याला छडीचा फटकासुद्धा मारला आणि त्यांच्या शालेय जीवनातील उत्कृष्ट आठवणींना उजाळा दिला आहे. छडीच्या आठवणीला पुन्हा उजाळा देण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे व्यक्त केली. कारण- त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी मुख्याध्यापकांच्या छडीरूपाने मिळालेल्या आशीर्वादाला दिले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Atheist_Krishna या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘येथे एका शाळेतील जुन्या विद्यार्थ्यांचे रियुनियन…!’ येथे काही विद्यार्थी जे कलेक्टर आहेत, पोलीस अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, व्यापारी आहेत आणि शाळांचे मालक आहेत; त्या सर्वांची एकच इच्छा होती की, मुख्याध्यापकांनी त्यांना आपल्या छडीने एकदा मारावे. मुख्याध्यापकांच्या हस्ते त्यांना ‘छडीचा आशीर्वाद’ मिळाला, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.