Video Shows Man Help Ghorpad Who Trapped In A Glass : आपण जगत असताना दुसऱ्यालाही जगायला मदत करणे हीच खरी मानवता. एखाद्या विक्रेत्याला खडबडीत रस्त्यावरून गाडी नेण्यास, वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास आदी छोट्या गोष्टींद्वारे अडलेल्यांना मदत केल्यावर दिवसभर जो अभिमान वाटतो, तो शब्दांत मांडणे खरे तर कठीण असते. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मुक्या प्राण्याला मदतीची गरज असते. तसेच अशा वेळी कोणतीही भीती मनात न बाळगता, तो त्या प्राण्याच्या मदतीसाठी धावून जातो.
व्हायरल व्हिडीओत एक घोरपड रस्त्याच्या मधोमध दिसते आहे. पण, या घोरपडीचे तोंड एका वस्तूमध्ये अडकलेले दिसते आहे. तोंड कदाचित ग्लासमध्ये अडकल्यामुळे तिला आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टी दिसायला मार्ग नव्हता. अनेक रिक्षा आणि दुचाकीचालक रस्त्यावरून ये-जा करीत असतात. पण, कोणाचीच त्या घोरपडीला वाचवण्याची हिंमत होत नाही. मग एक दुचाकीचालक हे दृश्य पाहतो आणि त्या मुक्या प्राण्याच्या मदतीस धावून जातो. दुचाकीचालक घोरपडीची सुटका करण्यासाठी दुचाकीवरून उतरतो.
त्यानंतर बराच वेळ तो घोरपडीच्या तोंडात अडकलेला ग्लास काढण्यास सुरुवात करतो. जेव्हा दुचाकी चालक ग्लास खेचतो तेव्हा घोरपड वेगाने हालचाल करण्यास सुरुवात करते. त्यामुळे दुचाकीचालकास तिला बाहेर काढणे कठीण होऊन बसते. मग तो रस्त्यावरून जाणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला घोरपडीची शेपटी पायाने पकडण्यास सांगतो. त्यानंतर भरपूर जोर लावून अखेर तो घोरपडीची त्या ग्लासातून सुटका करण्यात यशस्वी होतो. सुटका होताच घोरपडदेखील तेथून पळ काढते.
व्हिडीओ नक्की बघा
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो (Viral Video) :
घोरपडीची सुटका होईपर्यंत अनेक जण हे दृश्य अगदी टक लावून पाहत असतात आणि सुटका झाल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vetmonitoring या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘सोनेरी हृदयाचा माणूस’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांचे संरक्षण करणे ही आपल्या नागरिकांची जबाबदारी आहे. आज त्या घोरपडीचा जीव वाचवून, तिची सुटका करून त्या दुचाकीचालकाने ‘खरे साहस’ दाखवले आहे.