Viral Video Shows Girl Help 67 Years Old Coolie : प्रवासादरम्यान सामान किंवा बॅग उचलणे ही एक मोठी समस्या असते. सामान घरापासून ते स्टेशन आणि स्टेशन ते गाडीपर्यंत व्यवस्थित घेऊन जाणे, हा एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे काही रेल्वेस्थानकांवर प्रवाशांच्या बॅग, पेट्या कुली डोक्यावर वाहून नेतात. मात्र, चाके असलेली बॅग गाडीपर्यंत सहज ओढत नेता येते. या ट्रॉली बॅगांमुळे कुलींचा व्यवसाय अर्ध्यावर आणला आहे. अपेक्षेप्रमाणे काम आणि त्या कामाचा मोबदला न मिळाल्याने, तसेच कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या विचाराने कुलींवर मानसिक ताण पडत असावा. तर आज असाच एक डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेन्नई रेल्वेस्थानकावर कॅबमधून एक तरुणी उतरली तेव्हा तिला दिसले की, एक कुली तिच्या दिशेने चालत येत आहे आणि तिच्या बॅगा घेऊन जाण्याचे काम द्यावे म्हणून विनवणी करीत आहे. तरुणीने त्यांची तब्येत पाहून सुरुवातीला नकार दिला; पण तो त्या तरुणीच्या मागे लागला आणि बॅगा घेऊन जाण्यासाठी त्याने फक्त ५० रुपये मागितले. त्यामुळे तरुणीला धक्का बसला. म्हणून मग तरुणीने फक्त ट्रॉली घ्या, असे त्या वृद्ध कुलीला सांगितले. तरुणीने त्यांना ट्रॉली घेण्याची विनंती केली. कारण- ते त्यांच्यासाठी थोडे सोपे जाईल. एकदा बघाच हा हृदयस्पर्शी व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

तरुणीला समजले की, त्यांची तब्येत बिघडली असूनही ते पैसे कमावण्यासाठी काम करीत होते. हे पाहून तरुणीने त्यांचा व्हिडीओ काढण्याचे ठरवले. पण, त्याआधी ‘मी व्हिडीओ रेकॉर्ड करू शकते का?’ अशी तिने विचारणासुद्धा केली आणि त्यांनी तिला होकार दिला. त्यानंतर तरुणीने त्या वृद्ध कुलीबरोबर थोडीशी चर्चा केली आणि तेव्हा तिला समजले की, कुली ६७ वर्षांचे असूनही त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी काम करीत आहेत. हे ऐकून तरुणीसुद्धा भावूक झाली. त्यानंतर तरुणीने त्यांना नाश्ता दिला; पण त्यांनी नकार दिला आणि प्रवासात तू खा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

५० नाही तर ५०० रुपये टेकवले हातावर (Viral Video) :

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @josh__stories या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुणीने हा अनुभव कॅप्शनमध्ये लिहिला आहे. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाल्यामुळे तरुणी खूप आनंदी झाली आणि त्या दोघांनी एक सेल्फीसुद्धा काढला. कुली असलेल्या आजोबांना त्यांच्या आयडी बरोबर एक फोटो काढायचा होता. त्यांची ती इच्छादेखील तरुणीने पूर्ण केली. त्यानंतर तरुणीने त्यांच्या हातावर ५० नाही, तर ५०० रुपये ठेवले. त्यानंतर मी एक अभिमानी कुली आहे, असेदेखील ते आजोबा म्हणाले. हा व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा तरुणीचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत.