Viral Video Of Elderly Couple : नवरा आणि बायको यांच्या नात्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे प्रेम. पूर्वी एकमेकांना न बघताही लग्न व्हायची; पण तरीही त्यांना एकमेकांवरील प्रेम मुद्दामहून व्यक्त करण्याची गरज भासत नव्हती. मात्र, सध्या आपल्या आवडत्या व्यक्तीला ‘प्रपोज’ करण्याची वा लव्ह मॅरेजचा ट्रेंड जास्त प्रमाणात असल्याचे बघायला मिळते. आपल्याला सारखे सरप्राईज देणारा, दररोज प्रेम व्यक्त करणार अर्थातच हौशी नवरा मिळू देत, अशी अनेक तरुणींची इच्छा असते. तर आज सोशल मीडियावर आजी-आजोबांचा एक व्हिडीओ व्हायरल ( Viral Video) होत आहे. त्यामध्ये आजोबांनी एका खास पद्धतीत आजींवर असणारे त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे.
व्हायरल व्हिडीओत ओटभरणीचा कार्यक्रम सुरू असतो. त्यादरम्यान अँकर या कार्यक्रमाला होस्ट करत असतो. तेव्हा तो कुटुंबातील सदस्यांपैकी आजोबांना ओटभरणी असणाऱ्या जोडप्याचे लग्न कसे जमले, असे विचारतो. तेव्हा त्यांचे प्रेम होते, असे उत्तर आजोबा देतात. त्यानंतर तुमचे लग्न कसे जमले, अशी विचारणा अँकर मिश्कीलपणे करतो. तेव्हा आजोबा आमच्या आजोबांनी आमचे लग्न ठरवले, असे सांगतात. मग तुम्ही दोघांनी एकमेकांना पाहिले होते का, असे अँकर विचारतो, तेव्हा “आम्ही एकमेकांना पाहिले नव्हते.” हे उत्तर ऐकल्यावर अँकर, मग आता प्रेम व्यक्त करा, असे सांगतो. पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा प्रेमळ व्हिडीओ ( Viral Video)…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, अँकर आजी-आजोबांना समोरासमोर उभे करतो. आजोबा हातात माईक घेऊन, ‘आमचं आय लव्ह यू आहे पहिल्यापासूनच’, असे म्हणतात. हे ऐकताच आजी लाजताना दिसते. त्यानंतर आजोबा सगळ्यांच्या आग्रहाखातर ‘आय लव्ह यू’सुद्धा म्हणतात आणि खूश होऊन डान्स करण्यास सुरुवात करतात. हे पाहून कार्यक्रमाला उपस्थित सगळेच जोरजोरात टाळ्या वाजवण्यास सुरुवात करतात आणि आनंद व्यक्त करतात, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल.
अशी पिढी आता पुन्हा होणे नाही…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @its_shubz_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘साधी माणसं व त्यांचे साधे विचार, आपली शेवटची पिढी आहे ज्यांना हे सगळं अनुभवयाला मिळेल’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून ‘खरंच नशीब लागते शेवटपर्यंत प्रेम करणारा नवरा भेटायला’, ‘अशी पिढी आता पुन्हा होणे नाही’, ‘बस असा गोडवा पाहिजे दोघांच्या नात्यामध्ये’, ‘अशा साध्या माणसांची खूप गरज आहे आज’ आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.