Video Shows Grandmother Meet Her Best Friend : तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती नक्कीच असेल की, जिच्यासमोर तुम्ही मोकळेपणाने हसता, रडता, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवता. अशी ती व्यक्ती असते ती म्हणजे तुमची बेस्ट फ्रेंड. ही बेस्ट फ्रेंड म्हणजे तुमची मैत्रीण असू शकते किंवा मित्र. जेव्हा गरज वाटेल तेव्हा फोन करून आपले आनंदाचे व दुःखाचे किस्से ऐकवण्यासाठी आपण त्याला किंवा तिला सतत भेटायला बोलावत असतो. तसेच ही मैत्री अगदी म्हातारपणापर्यंत अशीच राहावी, असेही आपल्याला मनातून कुठेतरी वाटत असते.
तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे. व्हिडीओनुसार दोन आजींमध्ये बऱ्याच वर्षांपासून मैत्री आहे, असे दिसते आहे. त्यातील एक आजी आपल्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी जाण्याचे ठरवते. तर, ती आजी ठरवलेल्या ठिकाणी मैत्रिणीला भेटायला गेल्यावर तेथे काठी हातात घेऊन एकेक पाऊल टाकत शिड्यांवरून चढून वर जात असते. तर, दुसरी आजी तिची वाट बघत असते. त्यानंतर पहिली आजी मैत्रिणीच्या घरी पोहोचते. आपल्या मैत्रिणीला पाहिल्यावर दुसरी आजी नेमके काय करते हे पाहिल्यावर तुमचे डोळे भरून येतील एवढे तर नक्की…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, आपली मैत्रीण बऱ्याच वर्षांनी भेटायला आल्याचा आनंद दुसऱ्या आजीच्या गगनात मावत नाही. ती आपली मैत्रीण दरवाजात येऊन उभी राहिलीय हे पाहून, ती नकळत तिच्या पायांना स्पर्श करायला जाते. पण, तितक्यात भेटायला आलेली आजी तिला मायेने जवळ घेऊन मिठी मारते. त्यानंतर दोघी सोफ्यावर बसतात आणि मग त्यांचा एक सुंदर फोटो काढला जातो. ते दृश्य पाहून आपली मैत्रीही तेवढी टिकावी या विचाराने तुमचेही मन भरून आले असेल, एवढे तर नक्कीच.
हाच मैत्रीतील आदर आहे…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ (Video) @sunaina_dhyani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बेस्ट फ्रेंड्स’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून प्रचंड भावूक झाले आहेत. व्हिडीओतील सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे ती मैत्रिणीच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करते, हाच मैत्रीतील आदर आहे, अशी मैत्रीण शोधावी लागेल, मी दोन्ही आजींसाठी खूश आहे, अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तर, अनेक जण त्यांच्या बेस्ट फ्रेंड्सना कमेंट्समध्ये टॅग करताना दिसून आले आहेत. छोट्या छोट्या कारणांवरून सोशल मीडियावर ब्लॉक किंवा नकळत बोलणे बंद करणाऱ्या मैत्रिणींच्या काळात अशी मैत्री सापडणे सध्या कठीणच आहे नाही का?