Indian Railway Viral Video : भारतीय रेल्वेने रोज कोट्यावधी लोकं प्रवास करतात. अनेकदा रेल्वे प्रवासादरम्यानच्या अडचणी, समस्या लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत असतात, ज्यावर अनेकदा रेल्वे प्रशासनाकडून उत्तर दिले जाते. सध्या सोशल मीडियावर एका अपंग प्रवाश्याचा एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण व्हिडीओमध्ये अपंग प्रवासी आतून लॉक केलेला ट्रेनचा दरवाजा उघडण्याची विनंती करतो, पण ट्रेन सुरू होईपर्यंत कोणीही दरवाजा उघडत नाही, ज्यामुळे त्याला ट्रेनमध्ये चढता येत नाही. अशावेळी संतापलेल्या अवस्थेत तो चक्क हातातील कुबड्यांनी दरवाजा काच फोडण्याचा प्रयत्न करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकं होऊनही आतून एकही प्रवासी अपंग प्रवाशासाठी ट्रेनचा दरवाजा उघडत नाही. यावेळी रेल्वेस्थानकावर उभे असलेले लोक मात्र त्याची मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. ट्रेनच्या मालमत्तेचे अशाप्रकारे नुकसान करणे गुन्हाच आहे, पण तिकीट काढूनही ट्रेनमध्ये चढायला न मिळणे किंवा अशाप्रकारे दरवाजा बंद करून ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल प्रवासी आता रेल्वे प्रशासनाला विचारत आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती मागवून घेतली आहे.

अपंग प्रवाश्याने रागाच्या भरात कुबड्यांनी फोडली ट्रेनची काच

लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करताना अनेकांना असा अनुभव आला असेल की, ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचताच काही प्रवासी इतर प्रवाशांना चढू न देण्यासाठी ट्रेनचा दरवाजा आतून बंद करून ठेवतात. जेणेकरून एकही नवा प्रवासी ट्रेनमध्ये चढणार नाही आणि गर्दी वाढणार नाही. अशा प्रकारामुळे अनेकदा हाणामारी किंवा ट्रेनवर दगडफेकीच्यादेखील घटना घडतात. पण, यावेळी तिकीट असूनही चढू न दिलेल्या प्रवाशांना रेल्वेकडून कोणतीही भरपाई वैगरे दिली जात नाही. व्हिडीओतील प्रवाशाबाबतही अशीच घटना घडली.

पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रेल्वेस्थानकावर ट्रेन उभी असल्याचे दिसतेय. ही ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे. एवढी गर्दी आहे की, प्रवाशांनी इतर लोकांना चढण्यापासून रोखण्यासाठी आतून चक्क दरवाजे बंद करून घेतले आहेत. अशा परिस्थितीत तिथे एक अपंग प्रवासी येतो आणि तो दरवाजा उघडण्यास सांगतो. आतील प्रवाशांना तो दरवाजा उघडण्यासाठी खुणावतो.

रेल्वे प्रशासन अशा प्रवाश्यांवर कारवाई कधी करणार?

पण, एकही प्रवासी त्याचे ऐकत नाही. अशावेळी संतापलेला तो अपंग प्रवासी हातातील कुबड्या ट्रेनच्या दरवाजावर आदळू लागतो. इतक्यात पोलिस तिथे पोहोचतात आणि ते समजावून त्याला बाजूला जाण्यास सांगतात. पण, अशाप्रकारे ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखण्याचा अधिकार या प्रवाशांना कोणी दिला असा सवाल आता उपस्थितीत केला जात आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ट्रेनच्या या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

ट्रेनचा हा संतापजनक व्हिडीओ @rishbagree नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, “मी काही बोललो तर वाद होईल.” दुसऱ्याने लिहिले की, “लोक कोणत्याही भीतीशिवाय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कसे करतात, असा माझा प्रश्न आहे; अशा लोकांकडून पैसे वसूल केले जावेत,” काही युजर्सनी अशा लोकांना तुरुंगात टाकून अद्दल घडवण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे, तर काहींनी आतून दरवाजा बंद केलेल्या लोकांचा दोष आहे, आता हा अपंग माणूस ट्रेनमध्ये कसा चढणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video shows handicapped man hits crutch on train door after passengers not opening it indian railway ask for details sjr