Video Shows Dogs Training At Centre : राज्यात प्रत्येक पोलिस अधीक्षक कार्यालय आणि पोलिस आयुक्तालयाकडे श्वान पथक हे असतेच. पोलिसांना स्फोटके शोधून देणे, अमली पदार्थांचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणे यांसारख्या कामात हे श्वान मदत करतात, त्यामुळे या श्वानांना लहानपणापासूनच प्रशिक्षण दिले जाते. पण, तुम्ही कधी या इवल्याश्या श्वानांना प्रशिक्षण कसे देतात हे पाहिले आहे का? नाही… तर तुमची इच्छा आज पूर्ण होईल. कारण अलीकडेच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यांचा K9 पथकाचा जगातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
मध्य प्रदेशातील टेकनपूर येथील राष्ट्रीय श्वानांसाठी प्रशिक्षण केंद्र (एनटीसीडी) येथे चित्रित केलेला हा व्हिडीओ आहे. या केंद्रात १९७० पासून श्वानांना, योद्ध्यांना प्रशिक्षण दिले जाते, जिथे तुम्हाला श्वान कॅडेट्सची शिस्त, बुद्धिमत्ता आणि गोंडसपणा पाहता येईल; तर व्हिडीओची सुरुवात जर्मन शेफर्ड श्वान पिल्लांच्या एका गटाने होत आहे. त्यांना भेटवस्तू, भरपूर कौतुकाने आकर्षित केले जाते. शेपटी हलवत, कान उंचावत ही पिल्ले उर्जेने सूचनांचे पालन करतात. त्यानंतर हळूहळू लॅब्राडोरची पिल्ले जबाबदारी घेतात. त्यांचे मन, शरीर दोन्ही धारदार करण्यासाठी अडथळ्यांना मात करण्याचे विविध कोर्स आणि चपळता, कवायती त्यांना शिकवल्या जातात.
व्हिडीओ नक्की बघा…
बुद्धिमान,गोंडस विद्यार्थी (Viral Video)
केवळ प्युअरब्रेड्स नाही तर बीएसएफच्या पथकात इंडी श्वान (indie dogs) देखील समाविष्ट आहेत, ज्यांना कठोर प्रशिक्षण दिले जात आहे. व्हिडीओ जसजसा पुढे जातो, तसतसे तुम्हाला प्रशिक्षित श्वानांचे कॉम्प्लेक्स स्टंट आणि कामे अचूकपणे पार पाडतानाचे फोटो पाहायला मिळतात. नंतर अधिकारी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात, जे हँडलर आणि श्वानांमधील नाते अधोरेखित करते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्या अधिकृत @BSF_India या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही. ‘कार्य करण्यास प्रशिक्षित, एलिट फोर्समधील स्टार कलाकार’, ‘खरे नायक! त्यांचे धाडस अतुलनीय आहे’, ‘बुद्धिमान गोंडस विद्यार्थी’; आदी अनेक कौतुकास्पद कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत.