Viral Video Shows Husband And Wife Love : लग्न झाले की, पती-पत्नीमध्ये भांडणं होतात, पैशांची कमतरता, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मनं जपण्यात अयशस्वी होणं आदी गोष्टींमुळे वैवाहिक जीवनात मोठी समस्या निर्माण होते. पण, या सगळ्यामधूनही जो सगळ्या गोष्टी जपत, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत, संसार अगदी वर्षानुवर्षं चालवत पुढे घेऊन जातो तेच खरे जोडपे असते. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये काका-काकूंचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ नाशिकचा आहे. व्हिडीओत जोडप्याच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत असे वाटते आहे. जोडपे नाशिक येथील गोंदेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी गेले आहेत. गोंदेश्वर मंदिर महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावात आहे. हे महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरांची रचना इतकी सुंदर आहे की, त्या मंदिराचा आणि मंदिराभोवती आपला फोटो काढण्याची इच्छा कोणाच्याही मनात नक्कीच जागी होईल. व्हिडीओतील काकूंनासुद्धा तशीच काहीशी इच्छा व्यक्त केली आणि आपल्या जोडीदाराला फोटो काढण्यास सांगितलं.
व्हिडीओ नक्की बघा…
ते एकमेकांना आयुष्यभर साथ देऊ शकतात… (Viral Video)
सध्या छोट्या छोट्या कारणांवरून ब्रेकअप करणाऱ्या, पटत नाही म्हणून घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांना बघितल्यावर असे वाटते की, आपल्या आई-बाबांचा काळ खूप चांगला होता. त्यांनी स्वतःचे नाते कसे जपले असेल, असा प्रश्न आपसूकच मनात येतो. आज व्हायरल व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीलाही तसेच काहीसे वाटले आणि त्याने या जोडप्याला एकमेकांचा फोटो काढताना पाहिले. त्याने फक्त व्हिडीओच काढला नाही, तर सोशल मीडियावर शेअर करीत लिहिले की, इथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी एकमेकांना किती वेळा माफ केले असेल.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @auraofframes_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘प्रेम’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून नाते कसे असावे याबद्दल स्वतःचे मत मांडताना दिसत आहेत. “दोघांनी समजून घ्यावे लागते तेव्हा ते एकमेकांना आयुष्यभर साथ देऊ शकतात”, “दुसऱ्याचे उदाहरण घेण्यापेक्षा आपल्या आई-वडिलांचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवा” आदी वेगवेगळ्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.