Viral Video: शहरांमध्ये ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे ट्रॅफिक, प्रदूषण आदी अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतो. पण, या ट्रॅफिकदरम्यान विनाकारण जोरजोरात हॉर्न वाजवणे, आपली गाडी पुढे कशी जाईल याचा प्रयत्न करणे, चिडचिड करणे, दुसऱ्या वाहनचालकाशी भांडणे करणे अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. पण, तुम्ही कधी ट्रॅफिकदरम्यान सगळ्या गाड्यांना एका रांगेत, कोणताही आवाज न करता शांत उभं राहिलेलं पाहिलं आहे का ? नाही… तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रॅफिक जामदरम्यान गाड्या एका रांगेत उभ्या आहेत .
व्हायरल व्हिडीओ मेघालयचा आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूला सर्व वाहने संयमाने लांब ट्रॅफिक जाममध्ये रांगेत उभी होती. रस्त्याच्या मधोमध असलेली पांढरी रेषा ओलांडून एकानेही नियम मोडण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच यादरम्यान कोणताही वाहनचालक विनाकारण गाडीचे हॉर्न वाजवतो आहे असे तुम्हाला ऐकूदेखील येणार नाही. रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रेषेचे जणू काही हे संरक्षकच आहेत. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओतील हे दृश्य दुर्मीळ आहे. इतर ठिकाणी, इतर देशात ट्रॅफिक जाम पाहिलं तर संपूर्ण रस्ता वाहनांनी व्यापलेला असतो, येणाऱ्या वाहनचालकांसाठी जागाही सोडली नसते. पण, मेघालयमध्ये दिसणारं हे दृश्य अगदीचं अनोखं आणि कौतुकास्पद आहे. तसेच ट्रॅफिक जाम आहे म्हणून अनेक वाहनचालक गाडीच्या बाहेर येऊन एकमेकांशी संवाद साधताना, तर काही शांतपणे वाट पाहताना दिसून आले आहेत; हे पाहून हा व्हिडीओ अनेकांचं मन जिंकत आहे.
भारतातसुद्धा ट्रॅफिक पोलिस वेळोवेळी ट्रॅफिक जाम होणार नाही याची खबरदारी घेत असतात. पण, मेघालय राज्याच्या प्रभावी वाहतूक शिस्तीचे प्रदर्शन करणाऱ्या या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ Reddit ॲपवरून @Srihari_stan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आपल्या देशातसुद्धा असं दृश्य दिसायला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसत आहेत.