Video Shows Indian Family Welcomes Cow Into US Home : प्राचीन काळापासून गाईला मातेचा दर्जा आहे. गाय पवित्र आणि पूजनीय आहे. त्याचबरोबर शेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय प्राधान्याने केला जातो. त्यामध्ये गाईचाही समावेश असतो. दुग्धोत्पादनासाठी गाईला अनेक ठिकाणी प्रथम स्थान दिले जाते. गाईचे दूध शेतकरी विकून आपल्या पोटा-पाण्याचा खर्च भागवतात. त्यामुळे या गाईचे काही लोकांच्या मनात खूप अनोखे स्थान असते. हेच दृश्य दाखविणारा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडीओ (Video) कॅलिफोर्नियातील आहे. व्हिडीओतील अनोख्या भारतीय गृहप्रवेश समारंभाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय वंशाचे कुटुंब त्यांच्या नवीन घरात गाईचे स्वागत करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये श्री सुरभी गो क्षेत्राची गाय ‘बहुला’ (Bahula) दिसतेय. व्हिडीओच्या सुरुवातीला एक पुजारी गाईला घरात घेऊन येतो. त्या गाईच्या शरीरावर लाल रंगातील हातांचे ठसे, गजरा व गाईच्या पाठीवर गाईंचे चित्र असलेले कापडसुद्धा घातले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, गृहप्रवेश समारंभात गाईच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली आहे. पुजारी गाईला नवीन घरात घेऊन येतात आणि वाडग्यात चारा खायला देऊन, कुटुंबातील महिला तिला आरतीद्वारे ओवाळताना दिसतात. तसेच पूजा झाल्यानंतर गाईला घराबाहेर आणून, कुटुंबातील सदस्य तिच्याबरोबर फोटो आणि व्हिडीओ काढतानासुद्धा दिसत आहेत, जे पाहून आपली संस्कृती परदेशातसुद्धा जपली जाते आहे हे पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल.

संस्कृती जपली जात आहे…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bayareacows या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आमची गाय बहुला आज कॅलिफोर्नियातील गृहप्रवेश कार्यक्रमाला आली होती. तिचे जोरदार स्वागत झाले आणि खूप आनंद झाला. धन्यवाद बहुला’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हायरल व्हिडीओ गेल्या वर्षीच्या दिवाळीतला आहे, जो पुन्हा व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहून एका इन्स्टाग्राम युजरने, “जेव्हा नवीन घराची पूजा असते किंवा नवीन घरात गृहप्रवेश केला जातो, त्यादरम्यान गाईला घरात आणल्याने ती आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा देते, असे मानले जाते. संस्कृती जपली जात आहे हे पाहून आनंद होत आहे”, अशी कमेंट केली आहे.

Story img Loader