Viral Video Shows Loco Pilots Applied Emergency Brakes : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा आता सर्वच क्षेत्रांमध्ये वापर होऊ लागला आहे. कारण- यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अशातच आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित आक्रमण ओळखण्याची प्रणाली (Intrusion Detection System – IDS) च्या मदतीनं एक मोठं संकट टळलं आहे. आयडीएस म्हणजे एक असं सुरक्षा साधन, जे नेटवर्कच्या वाहतुकीत आणि उपकरणांमध्ये माहितीचा पाठपुरावा करतं. तर नक्की काय घडलं ते बातमीतून सविस्तर जाणून घेऊ…

तर घडलं असं की, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी, लोको पायलट जे. डी. दास आणि त्यांचे सहायक उमेश कुमार हे गुवाहाटी ते लुमडिंगपर्यंत कामरूप एक्स्प्रेस चालवीत होते. त्यावेळी हबईपूर आणि लामसाखंगदरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे. ६० हत्ती रेल्वे रूळ ओलांडत होते. त्या प्रसंगी या लोको पायलटना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम (IDS)द्वारे सतर्क करण्यात आले. त्यामुळे सावध झालेल्या लोको पायलटनी आपत्कालीन ब्रेक लावल्याने सुमारे ६० हत्ती अगदी सुखरूपपणे रेल्वे रूळ ओलांडू शकले.

हेही वाचा…मदत करावी तर अशी…! कावळ्याला वाचवण्यासाठी व्यक्तीची धडपड, VIRAL VIDEO तून पाहा कसा वाचवला जीव

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) हत्तीचा कळप रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसत आहे. तसेच एवढ्या हत्तींना रेल्वे रूळ ओलांडताना पाहून लोको पायलटसुद्धा थक्क झाला आहे, असं तुम्हाला व्हिडीओच्या ऑडिओमध्ये ऐकायला येईल. हत्तीच्या कळपानं वेगानं रेल्वे रूळ ओलांडावेत यासाठी काही पुरुष फटाके जाळतानासुद्धा दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी रिपोस्ट केला आणि त्यांनी कॅप्शनमध्ये लोको पायलटचं कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @supriyasahuias या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आयएएस सुप्रिया साहू यांनी हत्तींचे जीव वाचविल्याबद्दल लोको पायलटचे कौतुक केले. ‘अविश्वसनीय दृश्य! १५९५९ कामरूप एक्स्प्रेसचे लोको पायलट दास आणि सहायक लोको पायलट उमेश कुमार यांनी १६ ऑक्टोबर रोजी आपत्कालीन ब्रेक लावून हबईपूर आणि लामसाखंगदरम्यान रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या सुमारे ६० हत्तींच्या कळपाला वाचवले’, अशी कॅप्शन लिहिली आहे. अनेक नेटकरीसुद्धा लोको पायलटच्या या कृत्याची प्रशंसा करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.