Video Shows Mother inspired Her Daughter : पूर्वीच्या काळी चूल आणि मूल या चौकटीत महिलांचे जग असायचे. पण, आता महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख बनवताना दिसत आहेत. अनेकदा लहान मुले अभ्यास करायला किंवा एखादी नवीन ॲक्टिव्हिटी शिकण्यास कंटाळा करायची तेव्हा आई “माझ्यासारखी घरातील कामं करायची असतील, तर असाच कंटाळा कर”, असा टोमणा मारायची. तर असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यामध्ये एक आई आपल्या चिमुकलीला अशाच प्रकारे समजावताना दिसते आहे.
व्हायरल व्हिडीओत चिमुकली राधना रडताना दिसते आहे. रोप मल्लखांबचा सराव करताना ती दोरीवर काही गोष्टींचा सराव करण्यास घाबरत असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तिची आई तिच्या क्लासला येते आणि त्या रडणाऱ्या राधनाला, “तुला झाशीची राणी बनायचं आहे की माझ्यासारखं घरकाम करायचं आहे”, असे विचारते. मुलगी रडत रडत झाशीची राणी बनायचं आहे यावर मान डोलावते. त्यानंतर राधनाचे डोळे पुसत “तलवार घेऊन सरळ निघून जायचं. चल जा आता प्रॅक्टिस कर.. होणार तुझ्याकडून”, असे म्हणते आणि निघून जाते.
व्हिडीओ नक्की बघा…
आईसुद्धा कोणत्या झाशीच्या राणीपेक्षा कमी नसते (Viral Video)
आई आणि लेकीमधील हा क्षण सराव घेणाऱ्या माणसाने शूट केला आहे आणि सोशल मीडियावरसुद्धा शेअर केला. तसेच ‘जेव्हा आई तुमच्या पाठीशी असते तेव्हा काहीही अशक्य नसते. आई तुमच्याबरोबर असते तेव्हा घाबरण्याचे काय कारण, तिचे शब्द, तिची ऊर्जा, तिचा साधेपणा सगळं काही तुमच्यासोबत असते. एक आई नेहमीच तिच्या मुलीला या जगात अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ‘त्या प्रत्येक आईला सलाम’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mallakhamb_pattu_mumbaikar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून आईचे प्रेम स्वतःच्या शब्दांत मांडताना दिसत आहेत. “जगात सगळ्यात शुद्ध आणि पवित्र काही असेल, तर ते म्हणजे मातृप्रेम”, “आईसुद्धा कोणत्या झाशीच्या राणीपेक्षा कमी नसते”, “फक्त एक आईच आपल्या मुलाला एक चांगला माणूस बनवू शकते, ज्याची स्पर्धा जगातील कोणताही मानव करू शकत नाही” आदी अनेक कमेंट्स व्हिडीओखाली केल्याचे दिसत आहेत.