Viral Video Shows Pet Dog And Owner Sweetest Bond : पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी त्याचे प्राणी म्हणजे जीव की प्राण असतात. काही मालक या प्राण्यांना जोडीदार, मित्र, तर कुटुंबाचा एक सदस्य मानतात. स्वतःसाठी कपडे घेतानासुद्धा हे मालक आपल्या पाळीव प्राण्यांना विसरत नाहीत. अगदी बाईकवरून फिरायला जातानासुद्धा हे अगदी त्या प्राण्यांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे घेऊन जातात; तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये पाळीव प्राण्याने आपल्या मालकाला बाईकवर बसताना एका खास गोष्टीची आठवण करून दिली आहे.
व्हायरल व्हिडीओत मालक आपल्या पाळीव श्वानाबरोबर बाहेर जात असतो. यादरम्यान मालक बाईकसुद्धा घेऊन जातो. आधी बाईकवर मालक बसतो, त्यानंतर तो हेल्मेट घालतो. त्यानंतर श्वान दुसरे हेल्मेट तोंडात पकडतो आणि मालकाच्या बाईकजवळ घेऊन येतो. त्यानंतर श्वान हेल्मेट खाली ठेवून मालकाकडे बघतो. मग मालक हेल्मेट हातात द्यायला सांगतो. त्यानंतर श्वान मालकाच्या बाईकवर चढतो. मग मालक काय करतो ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, श्वानाने स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली दिसते आहे. श्वान आपल्या मालकाला हेल्मेटची आठवण करून देतो आणि स्वतःच आपले हेल्मेट तोंडात पकडून घेऊन येतो, हे पाहून मालक इम्प्रेस होतो. बाईकवर श्वान चढल्यानंतर तो त्याला आणि स्वतःलासुद्धा हेल्मेट घालतो आणि त्यांचा प्रवास सुरू करतो. अनेकदा हेल्मेट घालण्याचे आदेश वारंवार दुचाकीस्वारांना दिले जातात. पण, आज हे मुक्या प्राण्याला न सांगता कळल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @its__lovely या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच श्वानाने हेल्मेट घालण्याची आठवण करून दिली हे पाहून नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘माझाही असाच एक श्वान होता, जो माझ्याबरोबर सायकलवर बसायचा’, तर दुसरा म्हणतोय की, ‘त्याचे बरोबर आहे, हेल्मेट घालणे गरजेचे आहे’; आदी कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसत आहेत.