Mumbai Local Viral Video : आपल्यातील अनेक जण दररोज मुंबई लोकलने प्रवास करत असतील. ही मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची जणू लाइफलाइन. लोकल रेल्वेचा हा प्रवास सुखमय व्हावा म्हणून रेल्वेच्या अनेक डब्यांत सकाळी भजन चालू असते. अनेक प्रवासी त्यात सामील होतात आणि दिवसाची एक अनोखी सुरुवात करतात. घरी जातानाद्धा अनेक प्रवासी, दर्शक, प्रेक्षक, भजनीप्रेमी यांना हे भजन मंडळ दिवसभराचे काम, प्रवास यांतील ताण, थकवा घालवून एक वेगळीच दैवी ऊर्जा देऊन जाते. कित्येक दिवस ट्रेनची ठरलेली वेळ, ट्रेनचा ठरलेला डबा यांतून प्रवास करण्यातून त्या सहप्रवाशांतही मैत्रीचे एक घट्ट नाते तयार होते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल ( Viral Video) होत आहे.
व्हायरल व्हिडीओ मुंबई लोकलचा आहे. रेल्वेतून प्रवास करणारे काही प्रवासी गट करून ट्रेनमध्ये खाली बसलेले दिसत आहेत. राहुल म्हात्रे या इन्स्टाग्राम युजरच्या रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस असतो. या सदस्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व प्रवासी सज्ज झाले आहेत. वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीसाठी खास केक आणि गुलाबाच्या फुलांचा पुष्पगुच्छ आणला आहे. तर कोणते गाणे गाऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे हे व्हायरल व्हिडीओतून (Viral Video) तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
पेण-दिवा रेल्वे प्रवासी भजन मंडळ संगीतरत्न श्री नंदकुमार ठाकूर बुवा यांचा वाढदिवस असतो. केक कापून गुलाबाच्या फुलांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, ‘बार बार दिन ये आए…’ हे गाणे भजनी पद्धतीने गायले जात आहे. लोकलमधील उपस्थित सगळेच टाळ्यांच्या गजरात आणि गाणे गाऊन श्री नंदकुमार ठाकूर बुवा यांचा वाढदिवस आणखीन खास करत आहेत. ‘जेव्हा आमच्या रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस असतो’ असा मजकूर या व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे.
तुम्ही भाग्यवान आहात
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rr_mhatre_01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पेण दिवा रेल्वे प्रवासी भजन मंडळ संगीतरत्न श्री नंदकुमार ठाकूर बुवा यांचा जन्मदिवस’, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. व्हायरल व्हिडीओ ८ डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता; जो आज पुन्हा व्हायरल होतो आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून नंदकुमार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत आणि तुम्ही भाग्यवान आहात की, तुमच्याकडे असा ग्रुप आहे आदी अनेक कमेंट्स व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी केल्या आहेत.