Viral Video Shows Mother And Son Sweetest Bond : मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यात बाबा खर्चाचा हातभार लावत असले तरीही या प्रवासात आईचादेखील मोठा वाटा असतो. त्यांना जॉबला जाईपर्यंत काय हवं काय नको या गोष्टी बघणे, त्यांच्यासाठी डब्बा करणे, घरी आल्यावर गरमागरम नाश्ता देणे आदी अनेक गोष्टी ती न थकता मुलांसाठी करत असते, त्यामुळे खासकरून मुलांसाठी आई ही अगदी जवळची असते, त्यामुळे पहिला पगार असू देत किंवा पहिली गाडी, तिच्यावर पहिला हक्क फक्त आणि फक्त आईचाच असतो; तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
व्हायरल व्हिडीओत लेकाने नवीन गाडी खरेदी केलेली असते. या नवीन गाडीत तो सगळ्यात आधी आईला बसवतो. त्यानंतर आईला गाडी सुरू करण्यास सांगतो. तेव्हा आई थोडी घाबरलेली आणि टेन्शनमध्ये दिसते. एकदा-दोनदा ती गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करते, पण तिचा प्रयत्न अयशस्वी ठरतो. त्यानंतर आईचा लेक तिची मदत करतो आणि जेव्हा गाडी सुरू होते तेव्हा मात्र आईच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगा असतो; जो शब्दात मांडणे कठीण आहे.
पहिली सुरुवात तिच्याकडूनच व्हायला हवी (Viral Video)
आईचे हावभाव आयुष्यभर आठवणीत राहण्यासाठी लेकाने आधीच या क्षणाचे व्हिडीओ शूट करून घेण्याची तयारी केली होती. आई गाडीत बसण्यापासून ते अगदी गाडी स्टार्ट करण्यापर्यंत आईचे प्रत्येक हावभाव या व्हिडीओत अगदी खासरित्या रेकॉर्ड झाले आहेत. गाडी स्टार्ट करताच ‘बघ झाली ना चालू’ असे लेकाने म्हणताच आई आनंदाने मान डोलावण्यास सुरुवात करते. जणू काही तिने केलेल्या कष्टाचे चीज झाले, असे ती नकळत मनात म्हणताना दिसते आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @okayrahul_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘म्हणून पहिली सुरुवात तिच्याकडूनच व्हायला हवी’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि आमच्या आयुष्यात हा क्षण कधी येईल याची आम्हीसुद्धा वाट बघत आहोत, असे आवर्जून कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.