Son Give Biggest Surprise To His Father And Mother : आपण जसजसे मोठे होत जातो, नोकरी करायला लागतो तोपर्यंत आई-बाबा निवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचतात. मग उच्च शिक्षण, नोकरी, परत त्याची सेटलमेंट, नातवंडे असे करेपर्यंत आई-वडील हळूहळू सत्तरीच्या घरात असतात. या अनेक वर्षांत घर, कुटुंब व मुलांच्या जबाबदारीतून त्यांना स्वतःसाठी, कुठेही फिरायला जाण्यासाठीही वेळ मिळालेला नसतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून, कष्टाच्या कमाईने काही लेकरे आपल्या आई-बाबांना परदेशात फिरायला घेऊन जातात. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कष्टाच्या कमाईने पालकांना परदेशात घेऊन जाणे हे इन्स्टाग्राम युजर राज ओसवालचे एक स्वप्न होतं. कारण- त्यांच्या आई-बाबानी संपूर्ण आयुष्य त्यांच्या मुलांसाठी समर्पित केले, कधीही स्वतःबद्दल विचार केला नाही, फक्त स्वतःच्या आनंदासाठी कधी सहलीलाही गेले नाहीत. अनेक वर्षं लोटून गेली; पण त्यांना कधीही प्रवास करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे राजला माहीत होतं की, आता पालकांसाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. म्हणून त्याने खास सरप्राईज प्लॅन केला. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, राजने त्यांना दुबईला घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता. पण, त्याच्या आई-बाबांना वाटले होते की, राज त्यांना उदयपूरला घेऊन जाणार आहे. पण, जेव्हा राज त्यांना घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याने आई-बाबांच्या हातात ‘तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट’ असे म्हणून पासपोर्ट दिला. ते पाहिल्यावर सुरुवातीला ते गोंधळले. आईने थेट पासपोर्ट चेक करायला घेतला, तर बाबा डोके खाजवू लागले. मग जेव्हा त्यांना विश्वास पटला तेव्हा त्यांना बसलेला सुखद धक्का, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव, डोळ्यांतून व्यक्त होणारा आनंद आदी क्षण अगदीच अमूल्य असे होते. मग त्यांनी दुबईत अनेक गोष्टींचा आनंद लुटला, जे पाहून तुमच्याही डोळ्यांत नकळत पाणी येईल.
हीच माझी सर्वात मोठी देणगी (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rj__999 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘संपूर्ण प्रवासात, त्यांच्या हास्यामुळे सर्व काही सार्थक झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद -हीच माझी सर्वांत मोठी देणगी आहे आणि तो आनंद पुन्हा पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा “प्रत्येक मुला-मुलीचे हे स्वप्न असते की, त्यांच्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर एकदा तरी हा आनंद दिसावा” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.