Video Shows Student Birthday Celebration At School : लहानपणीचा वाढदिवस तुम्हाला आठवतोय का? आपला वाढदिवस आई-बाबा अगदी थाटामाटात साजरा करायचे. चाळीतल्या किंवा बिल्डिंगमधल्या मित्र-मैत्रिणींना बोलावून मोठा केक कापून, डोक्यावर मस्त टोपी घालून, छान नवनवीन कपडे आणि आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला फोटो काढण्याची आवड असेल अशी व्यक्ती आपले खास फोटोसुद्धा काढण्यास यायची. आता आपण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस साजरा करीत असलो तरीही या लहानपणीच्या वाढदिवसासारखे दुसरे सुख काहीच नाही.
वाढदिवसाच्या दिवशी शाळेतसुद्धा खास सेलिब्रेशन असते. नवीन कपडे घालून आणि भरपूर चॉकलेट घेऊन शाळेत जायचे. बाईंना फूल देऊन मग वर्गातील मुले हॅप्पी बर्थडेचे गाणे गातात. त्यानंतर मग वाढदिवस असलेला विद्यार्थी सगळ्यांना चॉकलेट द्यायला सुरुवात करतो किंवा ती विद्यार्थिनी चॉकलेटचे वाटप करते. आज व्हायरल व्हिडीओत याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले आहे. चिमुकल्याचा वाढदिवस असतो. तो छान गुलाबी रंगाचा कुर्ता घालून शाळेत जातो. तेव्हा शिक्षक त्याला ‘काय आहे आज’ असे विचारतो. तेव्हा चिमुकला काय म्हणतो ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
शाळेत चॉकलेट वाटण्यात वेगळाच आनंद होता…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, विद्यार्थ्याने नवीन कपडे घातलेले असतात म्हणून शिक्षक त्याची चेष्टा करीत “काय आहे आज”, असे विचारतात. “माझा बर्थडे आहे”, असे चिमुकला म्हणतो. “वाढदिवस आहे; मग काय काय आणलं खायला”, असे शिक्षक विचारतात आणि “चॉकलेट आणलेत”, असे बोलून तो पिशवीतून मूठभर चॉकलेट शिक्षकांना देतो. “केक नाही आणलास”, असे शिक्षकाने विचारल्यावर “अंधार पडल्यावर केक कापणार” असे मजेशीर उत्तर देतो व पळ काढतो आणि इथेच व्हिडीओचा गोड शेवट होतो.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘आज कितीही मोठा वाढदिवस केला तरीही असे शाळेत चॉकलेट वाटण्यात वेगळाच आनंद होता’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून शाळेच्या जुन्या आठवणींत रमून गेले आहेत. “शाळेत चॉकलेट वाटले म्हणजे खूप मोठा वाढदिवस झाला, असं वाटायचं”, “वाढदिवसानिमित्त शाळेत नवीन कपडे घालून जायचा काय आनंद होता राव”, “लईच भारी की भाऊ”, “गेले ते दिवस; राहिल्या फक्त आठवणी” आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्याचे दिसत आहेत.