Viral Video : ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गाण्याने केवळ नागपूरकरांनाच नव्हे, तर देशातील जनतेला वेड लावले आहे. गीतकार-गायक श्याम बैरागी यांनी हे सुप्रसिद्ध गाणे गायले आहे. या गाण्यावर विविध कार्यक्रमांत अगदी मजेशीर पद्धतीत डान्स बसवले जातात. लग्नात नवरी लग्न करून सासरी जाणार असते, तिच्यासाठी या गाण्यावर आवर्जून डान्स केला जातो. अनेक तरुण मंडळी या गाण्यावर मजेशीर हावभाव देत डान्स करतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून मोठ्यांना जे जमले नाही, ते चिमुकल्यांनी करून दाखवले, असे तुम्हीसुद्धा नक्कीच म्हणाल.
इंग्रजी वा हिंदी असो किंवा मराठी माध्यमाच्या सर्वसाधारणपणे प्रत्येक शाळेमध्ये वार्षिकोत्सव समारंभ साजरा केला जातो. या वार्षिकोत्सव कार्यक्रमात शाळेतल्या प्रत्येक वर्गातील काही विद्यार्थी सहभाग घेतात आणि डान्स, नाटक, ऑर्केस्ट्रा आदींद्वारे आपली कला सादर करतात. तर, व्हायरल व्हिडीओमध्ये एका शाळेचा वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये विद्यार्थी ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान केला आहे. एकदा बघाच हा कौतुकास्पद व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल’ या गाण्यावर डान्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान केला आहे. तसेच ज्या प्रकारे कचरा काढला जातो, तशाच स्वरूपाच्या स्टेप्स ते झाडू हातात घेऊन करत आहेत आणि इतरांना इथे-तिथे कचरा टाकू नका, असा संदेश सुद्धा देत आहेत. खोटा कचरा, पुठ्ठ्यांच्या कचऱ्याच्या गाड्या आणि कचराकुंडीसुद्धा स्टेजवर ठेवण्यात आली आहे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम गाण्याद्वारे चित्रित करण्यात आले आहे.
या गाण्यावर इतका चांगला डान्स सुद्धा होऊ शकतो
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shalinikhanna07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “कधी विचार नव्हता केला, या गाण्यावर इतका चांगला डान्ससुद्धा होऊ शकतो”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. विविध विभागांतील स्वच्छता कर्मचारी सकाळी चाळीत किंवा बिल्डिंगमध्ये येऊन आपला परिसर स्वच्छ करतात. त्यांच्या कामाचे कौतुक करीत विद्यार्थ्यांनी केलेला हा डान्स खूपच विचार करायला लावणारा आहे.