Video Shows Gate Fell On The Child : तुम्ही केलेली छोटीशी मदतही एखाद्याच्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाची ठरू शकते. आपल्या आजूबाजूला असे अनेक गरजू लोक असतात, जे हतबल असतात. कधी मर्यादेमुळे तर कधी त्यांच्यावर ओढवलेल्या संकटामुळे ते स्वतःला मदत करू शकत नाहीत. मग त्यांना मदत करण्यासाठी आपणच त्या क्षणी ठोस पाऊल उचलावे लागते. तर असेच मदतीचे पाऊल कोणा एका धडधाकट व्यक्तीने नव्हे, तर एका चिमुकल्याने उचलले आहे, जे पाहून तुम्ही त्याचे कौतुक केल्यापासून स्वतःला थांबवू शकणार नाहीत एवढे तर नक्की…

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे ते अद्याप कळू शकलेले नाही. दोन चिमुकले गेटबरोबर खेळत असतात. त्यांच्या त्या खेळात ते दोन चिमुकले गेटच्या दोन दरवाजांवर उभे असतात. दरम्यान, घडते असे की, एका चिमुकल्याच्या अंगावर गेटचा एक भाग पडतो. गेटचा एक भाग पडल्यावर दुसरा चिमुकला मागे वळून पाहतो. एका क्षणाला तो तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, इकडे-तिकडे माणसे आहेत का हेसुद्धा तो बघतो. पण, अगदी दुसऱ्या क्षणाला तो काय करतो ते पाहून तुमच्याही डोळ्यांत नक्कीच पाणी येईल.

व्हिडीओ नक्की बघा…

पुन्हा एकदा गेट उचलून बघतो (Viral Video) :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, गेटचा एक भाग एका बालकाच्या अंगावर पडताच त्याच्याबरोबर असणारा दुसरा चिमुकला त्याची मदत करण्यासाठी पुढे येतो. सुरुवातीला तो ते गेट उचलण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याच्याने तो गेटचा भाग अजिबात उचलला जात नाही. मग तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण, त्याच्या मनात काय येत माहीत नाही तो ते गेट पुन्हा एकदा उचलून बघतो आणि त्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरतो. तो काही सेकंद ते गेट हातांनी वर उचलतो आणि चिमुकला त्यातून बाहेर येतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bleu.rays या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘याला म्हणतात अ‍ॅड्रेनालाइन. ती घाई. ती न थांबणारी भावना. धडधडणारे हृदय. ती फक्त ऊर्जा नाही; ती अ‍ॅड्रेनालाइन आहे’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तर अ‍ॅड्रेनालाइन म्हणजे अ‍ॅड्रेनालाइन हार्मोन्स मानवी शरीराला कोणत्याही संभाव्य धोक्याला प्रतिसाद देण्यासाठी तयार करतात. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून त्या धाडसी चिमुकल्याचे वेगवेगळ्या शब्दांत कौतुक करताना दिसत आहेत.