Video Shows Woman Feeding Food To The Stray Dogs : आपण दिवसातून कमीत कमी दुपारी आणि रात्री असे दोन वेळा जेवतो. तसेच मधल्या वेळेत सुद्धा आपण काही ना काही खातच असतो. कधी भूक लागली तर आपण ऑनलाईन मागवतो किंवा मग पैसे घेऊन दुकानात जातो आणि पोटभर काहीतरी खाण्यासाठी घेतो. पण. भटक्या प्राण्यांचे काय? त्यांना हे सगळ करणे शक्य नसते. त्यामुळे ते दिवसरात्र अन्न-पाण्यासाठी इथे-तिथे भटकताना दिसतात. त्यामुळे त्यांना जर आपुलकीने कोणी खायला दिले तर ते लगेच त्या दिशेने पळ काढतात. हेच दृश्य दाखवणारा आजचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

तुम्ही अनेकदा तुमच्या परिसरात पहिले असेल की, एखादी तरी व्यक्ती अगदी पहाटे किंवा रात्री भटक्या मांजर आणि श्वानांसाठी बिस्कीट, दूध किंवा त्याच्या शरीरसाठी योग्य असे जेवण घरी बनवून आणतात आणि निस्वार्थी भावनेने त्यांना खाऊ घालतात. मग या भटक्या प्राण्यांना त्याची चाहूल लागली की, धावत-पळत ते अगदी या व्यक्तींपाशी जातात आणि जेवणाचा आनंद लुटतात. तर आज व्हायरल व्हिडीओत सुद्धा असेच पाहायला मिळाले आहे. एक महिला रस्त्यावर असणाऱ्या भटक्या, मुक्या श्वानांसाठी घरून काहीतरी बनवून घेऊन आली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

तसेच तिने रस्त्यावर काही पेपर टाकले आहेत. बादलीतून बऱ्याच श्वानांसाठी खायला आणणाऱ्या महिलेने हे सगळे अन्न त्या पेपरवर चमच्याने ओतले. अनेक श्वान तिथे आधीपासून उपस्थितच होते. पण, काही श्वानांना चाहूल लागताच ते अगदी धावत-पळत तिथपर्यंत पोहचले आणि अन्न खाण्यास सुरुवात करू लागले. हे पाहून तिथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने याचा व्हिडीओ काढला आणि ‘एका वेळेच्या जेवणाची किंमत काय असते ते या भटक्या श्वानांना विचारा’ अशा मेसेजसह शेअर केला.

आपण त्यांना खायला देणार नाही तर कोणाला (Viral Video) :

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @theworldisonebigfamily या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘जर आपण त्यांना खायला देणार नाही तर कोणाला? त्यांच्याशी दयाळूपणे वागा, त्यांना खायला द्या’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी सुद्धा ‘त्यांना खायला देऊन जी सुख-शांती मिळते ते इतरत्र कुठेही मिळत नाही’ , ‘हे श्वान माणसांपेक्षा चांगले आहेत, ते एकत्र अन्न तरी खात आहेत’ , ‘एकही भटका श्वान उपाशी राहणार नाही. देव पाहत आहे’ ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.