Viral Video Shows Women’s Life : मुलगी, पत्नी, आई मग आजी असा प्रत्येक स्त्रीचा प्रवास असतो. मुलगी असताना कुटुंबाची, पत्नी असताना नवीन घराची, आई असताना बाळाची, तर आजी झाल्यावर नातवाची जवाबदारी प्रत्येक स्त्रीच्या खांद्यावर असते. पण, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक रंजक वळण तेव्हा येते जेव्हा ती पत्नी किंवा आई होणार असते. कारण- ही जबाबदारी घेण्यापूर्वी तिला मनाने आणि शरीराने तयार व्हावे लागते. शिक्षण, नोकरी अर्धवट सोडून नवीन बाळाला जन्म देण्यासाठी किंवा कुटुंबासाठी तिला जबाबदारी घ्यावी लागत असते. तर आज हीच व्यथा सांगणारा एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे.
अनेकदा लग्न किंवा मूल झाल्यावर काही महिला घर, बाळ यांचा सांभाळ करण्यासाठी नोकरी सोडून देतात, त्यांच्या करिअरला फुलस्टॉप देतात. पण, त्यांच्या मनात कुठेतरी शिक्षण आणि नोकरी करण्याची इच्छा असते. पण, परिस्थिती अशी असते की, कोणता निर्णय घ्यावा हेच त्यांना कळत नसते. व्हायरल व्हिडीओतील श्रुतीने नेमका हाच मुद्दा अधोरेखित करणारा एक व्हिडीओ बनवला आहे. श्रुती एका फाईलमध्ये ठेवलेले पदवी प्रमाणपत्र बघताना दिसते आहे. त्याचबरोबर तिने व्हिडीओवर, ‘डोळ्यांत अक्षरशः पाणी येते जेव्हा या डिग्रीसाठी किती मेहनत केली होती हे आठवते,’ असा मजकूर लिहिला आहे. हृदयाला स्पर्श करणारा हा व्हायरल व्हिडीओ (Video) नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
९०% स्त्रियांना करिअरला फुलस्टॉप द्यावा लागतो
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @official19shruti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘स्त्रियांची जी भूमिका आहे, ती काही कमी नाही, याचीच त्यांना जाणीव नाही. त्यामुळे ते त्यांना “चूल आणि मूल”, असे वाटते. तेवढ्या विषयातसुद्धा कितीतरी करण्यासारखे आहे. पण, ते जाणीवपूर्वक केले जात नसल्याने त्याचे हवे तसे परिणाम दिसत नाहीत. लग्न आणि मूल झाल्यानंतर नाइलाजाने ९०% स्त्रियांना त्यांच्या करिअरला फुलस्टॉप द्यावा लागतो. पण प्रत्येक स्त्रीने आजच्या जगात स्वतःच्या पायावर उभे राहणे खूप गरजेचे आहे. त्याच्यामागचे कारण फक्त पैसाच नाही तर त्याबरोबर येणारे विचारस्वातंत्र्य आणि सुरक्षितता खूप गरजेची आहे,’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
@official19shruti ही महिला इतर महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण देते. तर तिने आज नोकरी आणि जबाबदारीमध्ये महिलांची होणारी व्यथा मांडली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून त्यांच्या भावना कमेंट्समध्ये सांगताना दिसत आहेत. ‘जागवलेल्या रात्री, घेतलेली मेहनत आणि कष्टांची साक्ष म्हणजे ही मार्कशीट… संघर्षाने घडवलेलं यश!, आणि आज तो फक्त एक कागद आहे. मनुष्याला आयुष्यभर कष्ट करावे लागतात, खरंच डोळ्यांत पाणी आले, जबाबदारीमुळे आपण स्वतःला विसरून जातो, आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.