Viral Video: लग्न म्हटले की, घरात अगदीच उत्साहाचे वातावरण असते. यादरम्यान खरेदी, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच नातेवाईक, पाहुणे आणि मित्र-मैत्रिणींना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका छापली जाते. या लग्नपत्रिका काही मॉडर्न, तर काही अगदीच साध्या असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक डिझाइन्सच्या विविध लग्नपत्रिका पाहिल्या असतील. पण, सोशल मीडियावर एक अनोखी लग्नपत्रिका व्हायरल होत आहे; जी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
या लग्नपत्रिकेला तुम्ही जगातील सर्वांत लहान लग्नपत्रिकाही म्हणू शकता. कारण- ही लग्नपत्रिका तुम्ही तुमच्या पाकीट वा खिशात कुठेही सुरक्षित ठेवू शकता. लग्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एवढ्या छोट्या कार्डवर काय लिहिले असेल? या कार्डवर तर फक्त नवरा-नवरीचीच नावे लिहिलेली दिसतील ना? तर तसे अजिबात नाही. इतर लग्नपत्रिकेप्रमाणे या पत्रिकेतही लग्नकार्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली जाते; जी नातेवाईक, पाहुणे, मित्र-मैत्रिणी यांच्यासाठी आवश्यक असते.
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ही लग्नपत्रिका चार वेळा फोल्ड करण्यात आली आहे. तसेच या प्रत्येक फोल्ड केलेल्या पानावर काय, कोण, कधी, कुठे (what, who, when, where) असे चार टप्पे छापण्यात आले आहेत. लग्नपत्रिकेचे एक पान उघडताच ती हळूहळू मोठी होत जाते आणि लग्नाची तारीख, मुहूर्त, आग्रहाचे आमंत्रण, निमंत्रकाचे नाव, विवाहस्थळ, रिसेप्शन आदी लग्नाशी संबंधित सर्व माहिती लिहिलेली दिसून येते. त्यानंतर लग्नपत्रिका पुन्हा दुमडली जाते आणि मूळ स्वरूपात अगदी लहान दिसू लागते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @abi_cards या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी ही लहान; पण खास अशी लग्नपत्रिका पाहून खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. तर काही जण लग्नपत्रिकेच्या अनोख्या रचनेची प्रशंसा करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत. एकूणच या लहानशा; पण क्रिएटिव्ह लग्नपत्रिकेने अनेकांची मने जिंकली आहेत.