Viral video: गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये फूड ब्लॉग बनवणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्सचे प्रमाण वाढले आहे. हे क्रिएटर्स स्वत:ला फूड ब्लॉगर म्हणवून घेतात. शहरामध्ये फिरुन फूड स्टॉल्स, हॉटेल्स, कॅफे अशा ठिकाणांना भेट देतात. तेथे मिळणारे पदार्थ ट्राय करत त्याचा रिव्ह्यू देतात. एखाद्या फूड स्टॉलला भेट दिल्यानंतर त्याचा पत्ता, तेथील स्पेशालिटी असलेले पदार्थ, त्या पदार्थांची किंमत अशा सर्व गोष्टी फूड ब्लॉग्समध्ये पाहायला मिळतात. इन्स्टाग्रामच्या रिल सेक्शनमध्ये असंख्य फूड ब्लॉगिंग व्हिडीओज पाहायला मिळतात. या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज असतात. अशाच एका व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये सूरतमधील एका दुकानाची माहिती देण्यात आली आहे. सूरतमधील या सोडा पबच्या दुकानामध्ये ‘चीज सोडा ब्लास्ट’ हे नवीन पेय लॉन्च करण्यात आले आहे. चीज सोडा ब्लास्ट तयार करण्यासाठी सर्वप्रथम दोन वेगळ्या प्रकारचे सोड्याचे फ्लेवर्स एकत्र केले जातात. पुढे एकत्र झालेल्या त्या मिश्रणामध्ये शेंगदाणे टाकले जातात. सर्वात शेवटी त्यावर चीज किसून टाकले जाते. हे पेय तयार करतानाचा व्हिडीओ मयूर सुर्ती या फूड ब्लाॅगरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
सूरतमधील या सोडा पब दुकानातला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याला दहा हजारांपेक्षा लाईक्स मिळाले आहे. बऱ्याच जणांनी कंमेट बॉक्समध्ये कमेंट करत आगळ्या-वेगळ्या चीज सोडा ब्लास्टबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने सूरतमध्ये अशा प्रकारचे प्रयोग करण्यावर बंदी यायला हवी असे म्हटले. तर दुसऱ्या यूजरने फक्त चीजच कशाला मेयो, शेजवान आणि थोड बटर सुद्धा टाकायचं होत ना.. अशी कमेंट केली आहे. काहीजणांनी हे सोडा पबचे दुकान बंद करा अशी मागणी केली आहे.
बरेचसे खाद्यपदार्थ विक्रेते त्यांनी तयार केलेल्या पदार्थांमध्ये चीज, बटर टाकून ग्राहकांना खायला देत असतात. सॅन्डविच, पिझा, पावभाजी यांवर चीज टाकल्यामुळे ते अधिक चविष्ट बनतात. सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात.