कॅलिफोर्नियातील एमरल्ड पूल हा त्याच्या सौंदर्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या पुलावरुन दिसणारे धबधबे म्हणजे निसर्गाच्या अविष्काराचे एक उत्तम रुपच आहे. हे सौंदर्य अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. येथील नदीपात्रात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी सर्व वयोगटातील नागरीक येतात. मात्र या पाण्याला वेग असल्याने इथे अनेक अपघातही होतात.
नुकताच याठिकाणी एक अपघात घडला आणि क्लानी ट्यूनो नावाची एक व्यक्ती या पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली. या प्रवाहात अतिशय मोठे दगड असल्याने व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी असते. मात्र सुदैवाने ट्यूनो या अपघातातून बचावला. साधारण अर्धा तासाच्या शर्थीच्या प्रर्यत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. २४ जून रोजी ही घटना घडली असून महामार्गावर गस्त घालणाऱ्या यंत्रणेला एक फोन आला. नदीच्या पाण्यात वाहणाऱ्या व्यक्तीला वाचवता येऊ शकते असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याने यंत्रणेचे लोक तत्परतेने याठिकाणी पोहोचले.
जवळपास अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनी त्यांनी ट्यूनोला शोधून काढले. तो नदीतील एका उंच दगडावर बसून राहिला होता. पाण्यापासून तो केवळ ५० फूट उंचीवर होता. आणि ही पाण्याची पातळी कधीही वाढू शकणार होती. ही घटना कॅमेरात कैद झाली असून या दगडापर्यंत पोहण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेतील हेलिकॉप्टरला कशाप्रकारे प्रयत्न करावे लागले हे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो. हवेच्या वेगामुळे हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आलेली दोरी ट्यूनोपर्यंत पोहोचण्यात अडचण येत होती. मात्र अखेर ट्यूनोला वाचविण्यात यंत्रणेला यश आले.