शहरांमधील अनेक शाळा आता हायटेक होत असल्या तरी आजही खेडोपाड्यांतील शाळा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक गावांत विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आवश्यक अशी वाहतूक सुविधा नाही. तसेच खेड्यांमधील शाळांमध्ये शहराच्या तुलनेत सुविधा वा व्यवस्थांची कमतरता आहे. परंतु, या शाळांमधील शिक्षक उपलब्ध असलेल्या कमी सुविधांमध्येही विद्यार्थ्यांना शिकवण्यात कसलीही कसर ठेवत नाहीत.
कधी ते वर्गात गाणी गाऊन मुलांना A, B, C, D शिकवतात; तर कधी देसी जुगाड वापरून वर्गाला ‘स्मार्ट क्लासरूम’मध्ये बदलतात. शिक्षकाने केलेल्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून लोक म्हणत आहेत की, गरज ही खरोखरच शोधांची जननी आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वर्गात एक विद्यार्थी अनोख्या पद्धतीने बाराखडीतील मात्रा इतर विद्यार्थ्यांना शिकवताना दिसतोय.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका विद्यार्थ्याने हातात लाकडी काठी धरली आहे; ज्याच्यावर ‘क’ लिहिलेले आहे. दुसर्या बाजूला फलकावर बाराखडीतील मात्रा लिहिलेल्या आहेत. हा विद्यार्थी काठीला चिटकवलेले क हे अक्षर एक-एक करून सर्व मात्रांवर घेऊन जातो आणि त्याचा उच्चार करतो. त्यानंतर वर्गात बसलेले सर्व विद्यार्थी त्याच्यामागे ही अक्षरे जोरात बोलतात. शिक्षकाच्या युक्तीची विद्यार्थ्यामार्फत अंमलबजावणी होताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वडेट्टीवार यांनी लिहिलेय की, सर्जनशील शिक्षणपद्धती सक्रिय शिक्षणाकडे नेत आहे.
फळ्यावर लिहिलेल्या तारखेनुसार हा व्हिडीओ १७ मे रोजी रेकॉर्ड करण्यात आला होता; जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला आततापर्यंत ७११ व्ह्युज मिळाले आहेत; तर ६५ हून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. यापूर्वीही अनेक सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पण हा व्हिडीओ कोणत्या राज्यातील आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर भारतात आजही असे अनेक शिक्षक आहेत, जे विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी ते विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचा वापर करीत आहेत. कधी नाचून, कधी गाऊन, तर कधी अशा वेगवेगळ्या प्रयोगांचा वापर या शिक्षकांकडून केला जात आहे.