Viral Video: बऱ्याचदा आपण काही चुकीचं काम केल्यावर आपली आई आपल्यावर रागावते, रुसते, आपल्याशी बोलत नाही. आईच्या रुसण्याने संपूर्ण घर शांत होतं. त्यामुळे आईचा अबोला, रुसवा कोणीही फार काळ सहन करू शकत नाही. त्यामुळे आईला मनवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. असे अनेक मजेशीर किस्से आपण खऱ्या आयुष्यात किंवा चित्रपट, मालिकांमध्ये पाहिलेच असतील. पण, सध्या अशा प्रकारच्या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक महिला चक्क तिच्या घरातील पाळीव श्वानावर रुसलेली आहे, ज्यामुळे तो श्वान खूप नाराज झाल्याचे दिसत आहे.
बऱ्याच घरांमध्ये श्वान पाळला जातो, तो अनेकांचा आवडता प्राणी आहे. या पाळीव प्राण्यावर लोकांचे जीवापाड प्रेम असते. श्वानाला घरातील सदस्याएवढीच उत्तम वागणूक दिली जाते. शिवाय त्याची आवड-निवडही पूर्ण केली जाते. हल्ली लोक श्वानांचा वाढदिवसदेखील आवडीने साजरा करतात, त्याला फिरायला घेऊन जातात. त्यामुळे श्वानाचेदेखील त्या घरातील प्रत्येकाशी खास नाते असते. अनेकदा ते घरातील लहान मुलांची काळजी घेतानादेखील दिसतात, तर बऱ्याचदा घरातील मालकाला कामात मदत करताना दिसतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक श्वान त्याच्या मालकिणीची समजूत काढताना दिसतोय.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरातील मालकीण एका ठिकाणी शांत बसली असून ती कोणत्यातरी कारणावरून श्वानावर रुसली आहे. त्यामुळे ती शेजारी बसलेल्या श्वानाकडे दुर्लक्ष करताना दिसतेय. श्वान बराचवेळ त्या महिलेकडे पाहतो, पण ती त्याच्याकडे अजिबात पाहत नाही, त्यानंतर तो महिलेच्या मांडीवर पाय ठेवून तिला हलवतो, पण तरीही ती त्याकडे पाहत नाही. तरीही श्वान तिला पुन्हा पुन्हा पाहतो. व्हिडीओच्या शेवटी रुसवा घालवण्यासाठी श्वान करत असलेले प्रयत्न पाहून त्या महिलेला हसू येतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bhopalviral1 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन मिलियन व्ह्यूज मिळाल्या असून यावर दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आईचा रुसवा घालवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, ऑल द बेस्ट भावा”; तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “आई त्याला माफ कर”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बिचारा किती नाराज आहे”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “हा किती निरागस आहे”, तर अनेक जण या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वीदेखील श्वानांचे असे अनेक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यातील एका व्हिडीओत एक मालकीण श्वानाला चिकन दाखवून भाजी खायला घालत होती, तर आणखी एका व्हिडीओमध्ये श्वान मालकिणीला चकवून पाण्यात भिजायला गेला होता.