Viral Video: प्रत्येकाच्या आयुष्यात जन्म देणाऱ्या आई-वडिलांचे स्थान सर्वात वरच्या स्थानी असते. जन्मापासून प्रत्येकालाच आई-वडिलांचा सहवास आणि प्रेमाची ओढ असते. आई-वडिलांकडून मिळालेले प्रेम, शिकवण लहानपणापासूनच मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. मात्र, अनेकदा काही बेजबाबदार पालक मुलं जन्माला घालतात, पण आपापसातील भांडणांमुळे मुलांपासून वेगळे होतात. अनेकदा आई-वडिलांमधील एक जण मुलांचा सांभाळ करतो, तर कधीकधी दोघेही मुलांना वाऱ्यावर टाकून आपापले मार्ग निवडतात. सध्या सोशल मीडियावर एका विद्यार्थिनीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या आयुष्यातील हेच दुःख सांगताना दिसत आहे.

आजकाल समोर येणाऱ्या अनेक घटनांमुळे आई-वडीलदेखील मुलांचे शत्रू होऊ शकतात यावर तुमचा विश्वास बसेल. आई-बापाच्या प्रेमाची भूक प्रत्येक लेकरामध्ये असते. त्यांनी आपल्याला जवळ घ्यावं, जीव लावावा असं प्रत्येक लहान मुलाला वाटतं. परंतु, कधी कधी काहींना हे सुख अनुभवायला मिळत नाही. खरंतर, आई-वडिलांचा घटस्फोट होतो किंवा त्यांचं पटत नाही म्हणून ते मुलांना वाऱ्यावर सोडून निघून जातात. अशा अनेक घटना तुम्ही आजवर मालिका किंवा चित्रपटांमध्येच पाहिल्या असतील. खऱ्या आयुष्यात अशा घटना फार क्वचित ऐकायला मिळतात. आता अशीच घटना समोर आली आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शालेय विद्यार्थिनी तिच्या वर्गातील इतर विद्यार्थिनींसह एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात गेली असून यावेळी व्याख्यानानंतर सर्व मुली आपापल्या आई-वडिलांविषयी मनोगत व्यक्त करतात. यावेळी एक विद्यार्थिनी आई-वडिलांविषयी बोलताना ढसाढसा रडायला सुरुवात करते. ती म्हणते, “मी माझ्या वडिलांना कधीच पाहिलं नाही, ते आम्हाला सोडून निघून गेले. आज मी हे व्याख्यान ऐकलं तेव्हा असं वाटलं की, आज ते असते माझ्याबरोबर तर किती बरं झालं असतं. मी सगळ्यांचे वडील बघते, त्यांचं प्रेम बघते. पण, मला असं प्रेम कधीच मिळालं नाही. खरंच वडील पाहिजेत. ज्यांना नसतात त्यांनाच कळतं. आता माझी आईपण नाही, तिने पण दुसरं लग्न केलं, ती सुद्धा निघून गेली. मी माझ्या आजी-बाबांबरोबर राहते, त्यांनीच माझा सांभाळ केला. ” विद्यार्थिनीचं हे मनोगत ऐकून बाजूला उभा राहिलेला व्याख्यान देणारा व्यक्ती आणि इतर मुलीही रडायला सुरुवात करतात. या व्हिडीओवर अनेक नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vasant_hankare_3232 या अकाउंटवर शेअर केला असून यावर सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच एका युजरने लिहिलंय की, “त्या आजी-आजोबांना सलाम, ज्यांनी तुझा सांभाळ केला.. लेकरा, तुझे भविष्य उज्वल आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “एवढी लहान आहेस, पण विचार खूप मोठे आहेत”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “निःशब्द डोळ्यात पाणी आले”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप वाईट वाटलं बाळा तू बोलताना आणि तुझं ऐकताना, तुला वडिलांचं प्रेम नाही मिळालं हे खूप मोठं दुःख आहे आणि आई असूनसुद्धा तिने तुझा विचार न करता दुसरं लग्न केलं आणि आज आजी-आजोबा तुला संभाळतात.”

Story img Loader