Viral Video: सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती उद्भवली असून अनेक घरांमध्येदेखील पाणी शिरलेले आहे. या सर्व परिस्थितीमुळे काही जिल्ह्यांतील शाळांना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, जोरदार पाऊस असूनही अनेक जण पावसाच्या पाण्यात पोहताना, मजामस्ती करताना दिसतात; त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत पाहायला मिळतात. दरम्यान, मुलांना देण्यात आलेल्या शाळेच्या सुट्ट्यांबाबतीतला एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. त्यात एका तरुणाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या बालपणातील एक खदखद व्यक्त करताना दिसत आहे.
“पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल का?” एका मराठी गाण्यामध्ये हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आपल्या लहानपणी बऱ्याचदा कितीही पाऊस पडला तरीही शाळेला सुट्टी नसायची, शिवाय अनेकदा हा पाऊस रात्रभर पडायचा, पण नेमका शाळा भरायच्या वेळेला थांबायचा; अशावेळीदेखील शाळेला सुट्टी मिळायची नाही. आपल्यापैकी अनेकांना शाळेत असताना पावसामुळे शाळेला सुट्टी मिळावी असं वाटायचं. पण, आपली ही इच्छा फार कमी वेळा पूर्ण झाली असेल. मात्र, हल्लीच्या मुलांना थोडा पाऊस पडला तरी लगेच सुट्टी दिली जाते. याचसंदर्भात खदखद एका तरुणाने व्यक्त केली आहे.
नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण म्हणताना दिसतोय की, “हाच तो पाऊस… जो आमच्या बालपणी रात्रभर पडायचा, पण नेमकी शाळेत जायची वेळ झाली की, थांबायचा. पण, आजकालच्या मुलांना जरा पाऊस पडला की, लगेच सुट्टी दिली जाते, हे पाहून आमचा जीव जळतो. या पावसामुळे आमच्या कितीतरी सुट्ट्या बुडाल्या आहेत. आमच्या जीवाची किती घालमेल होते, तुम्हीपण समजून घ्या… आम्हाला पण सुट्ट्या द्या. तेव्हाच्या सुट्ट्या आता द्या.. प्लीज द्या”, हा व्हिडीओ शेअर करत या तरुणाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “प्रत्येक ९० च्या दशकातील मुले याच्याशी सहमत असू शकतात.”
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @that_fatt_guyy या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर पंचवीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने या व्हिडीओवर लिहिलंय की, “आणि आता कामावर पोचल्यानंतर पाऊस जातो आणि ड्युटी संपायच्या आधी चालू होतो”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “खरं आहे भाऊ तुझं, आपल्या वेळेस पूर आला तरी आपले आई-बाप कुत्र्यासारखे मारून हाणून शाळेत पाठवायचे आणि जर त्यांनी नाही पाठवलं तर दुसऱ्या दिवशी मास्तर आणि आपली बाई चार-चार छड्या टाकायची बघा हातावर”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खरंच राव तुमचं बोलणं ऐकून आमचापण जीव जळतो. तुम्हालापण सुट्टी मिळेल, पण आम्ही गृहिणी असून आम्हाला सुट्टी नाही राव.”