Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यात कधी मनोरंजन करणारे, तर कधी आपल्या मनाला भावूक करणारे व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका लग्नामध्ये भावा-बहिणीचं अतूट प्रेम पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
बहीण-भावामधील प्रेम आणि भांडणं ही जगजाहीर असतात. ही भावंडं एकमेकांबरोबर क्षणात भांडतात आणि क्षणात पुन्हा एकत्र येतात. भाऊ आपल्या बहिणीला “लवकर लग्न करून जा म्हणजे आमचा त्रास कमी होईल…” असे टोमणे कितीही मारत असला तरी बहिणीच्या लग्नात तोच सर्वांत जास्त रडताना दिसतो. आपल्या बहिणीच्या लग्नानंतर तिच्याबरोबरचं गोड भांडण कायमचं संपणार आणि ती आपल्याला दररोज दिसणार नाही, या विचारानं भावाला गहिवरून येतं. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्नमंडपामध्ये भाऊ आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा कान पिळण्यासाठी आला असून, तो तिथे ढसाढसा रडायला सुरुवात करतो. यावेळी त्याची बहीणही त्याच्याकडे पाहून रडायला सुरिवात करते. त्यानंतर त्याची आई आणि मंडपातील इतर महिला त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. भावा-बहिणीच्या नात्याचा हा मनाला स्पर्शून जाणारा क्षण पाहून नेटकरीही आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_wedding_couple या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “दादा, डोळ्यांत पाणी आलं रे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “भाऊ-बहिणी कितीही भांडले; पण त्यांचं प्रेम कधीच कमी होणार नाय.” आणखी एकानं लिहिलंय, “ते कितीही भांडले तरी ते भाऊ-बहिणीच प्रेम आहे.”