Viral Video: आजकाल सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे विनोदी असतात. तर काही व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. तसेच काही व्हायरल व्हिडीओ भीतीदायक असतात. अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. हा व्हिडीओ देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील पश्चिम भागातला आहे, असे म्हटले जात आहे. यात एक व्यक्ती चार मजली इमारतीवर कोणत्याही साहित्याशिवाय चढताना दिसत आहे. त्याच्या कृत्यांवरुन हा माणूस चोर असावा असा अंदाज लोक लावत आहेत.
स्पायडरमॅन प्रमाणे भिंतीवरुन इमारतीवर चढला चोर
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भिंतीवरुन वर झपझप इमारतीवर चढत असल्याचे दिसते. काही सेंकदांमध्ये ती व्यक्ती इमारतीच्या गच्चीवर पोहोचते. यावरुन हे काम करण्यात पटाईत आहे हे समजते. ती व्यक्ती इमारतीच्या गच्चीवर पोहचल्यावर इकडे-तिकडे पाहत असते. तेव्हा त्याचा व्हिडीओ बनवणारे लोक त्याला आवाज देतात आणि “तिकडेच थांब..” असं जोरात म्हणतात. आपल्याला लोकांनी पाहिलं आहे हे समजल्यावर ती व्यक्ती/ चोर ज्या भिंतीवर चढून वर आलेला असतो, त्या भिंतीला जोडलेल्या पाईप्सना पकडून क्षणार्धात खाली उतरतो. इमारतीच्या बाजूला टाकलेली चप्पल घालतो आणि धूम ठोकतो.
व्हायरल झालेला व्हिडीओ @gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी इमारतीवर चढलेल्या व्यक्तीला चोर म्हटले आहे. ही घटना पश्चिम दिल्लीमध्ये घडली असल्याचेही कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे. या व्हिडीओला ९०,००० पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. व्हिडीओवर ट्विटर यूजर्सच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर एकाने ‘आजकाल चोरांचे धाडस वाढले आहे’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘व्हिडीओ काढणाऱ्यांनी दगड मारुन त्या चोराला पाडायला हवं होतं’ अशी कमेंट केली आहे.