Viral Video: समाजमाध्यमांवर सध्या गणेशोत्सवादरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. यंदा बऱ्याच ठिकाणी बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीत आणि विसर्जन मिरवणुकीत अनेक सामाजिक संदेश देणारे पोस्टर आणि पाट्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या. यातील महत्त्वाचे संदेश अनेकांना भावले. आतादेखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील एक पोस्टर खूप व्हायरल होतोय, जो सोशल मीडियाच्या काळातील कटू सत्य दाखवत आहे.
पूर्वीदेखील प्रत्येक सण उत्साहात साजरे केले जायचे आणि आतादेखील प्रत्येक सण उत्साहातच साजरे केले जातात. पण, पूर्वीच्या सण साजरा करण्याच्या पद्धतीत आणि आताच्या पद्धतीत खूप फरक निर्माण झाला आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा फरक म्हणजे पूर्वी कोणताही सण फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी साजरा केला जात नव्हता आणि आता सर्व सण केवळ फोटो, व्हिडीओ आणि रील्स बनवण्यासाठीच साजरे केले जातात. त्यामुळे पूर्वीच्या लोकांप्रमाणे आताच्या लोकांमध्ये सणांबद्दलची भावना पाहायला मिळत नाही. सणाच्या दिवशी केवळ चांगले कपडे घालून फोटो आणि व्हिडीओ काढण्यात अनेकांना आनंद मिळतो, हेच आताच्या सणांचे कटू सत्य आहे. याचीच जाणीव करून देणारे एक पोस्टर सध्या चर्चेत आलं आहे, ज्यावर एका व्यक्तीने असं काहीतरी लिहिलंय, जे वाचून अनेक जण निराश झाले आहेत.
नक्की काय आहे व्हिडीओमध्ये?
हा व्हायरल व्हिडीओ बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील असून यात एक व्यक्ती हातात पोस्टर घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी त्या व्यक्तीच्या हातातील पोस्टरमध्ये, “माफी असूद्या बाप्पा Reel, story, snapच्या नादात हात जोडायचे विसरून गेलो”, असं लिहिण्यात आलं आहे. हे कटू सत्य वाचताच नेटकरीही नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.
हा व्हिडीओ @aashishborole या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्याला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून पन्नास हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. युजर्स यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने लिहिलंय की, “खरं आहे भावा हे, आपण लहान असताना दिवस वेगळे होते, आता ते दिवस नाही परत येणार”; तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मी आधी हात जोडले अणि नंतर फोटो काढले”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “भाऊ सत्य परिस्थिती आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले लोक फक्त फोटोपुरते बाप्पाकडे येत होते; जगाला दाखवायला आम्ही गणपती बघून आलो. रीलच्या नादात रिअल गोष्टी विसरत चाललोय.”