उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की घराघरांमधून बाहेर जाण्याचे बेत ठरायला लागतात. घरातल्या लहान मुलांचा अनेक ठिकाणी जायचा उत्साह असतो. त्यांना भरपूर मस्ती करायची असते. या सगळ्या प्लॅन्सना वर्षभर पालकांनी ‘उन्हाळ्याच्या सुट्टीत जाऊ हं’ असं म्हणत स्थगिती दिलेली असते. पण आता उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर या कार्यक्रमाचा हिशोब बच्चेकंपनीकडून मागितला जातो.
मग वेगवेगळ्या ट्रिप्सचे प्लॅन्स आखले जातात. मुंबईत राहणाऱ्या मुलांना वाॅटर किंगडम, एस्सेल वर्ल्ड अशा ठिकाणी जायचे प्लॅन्स आखले जातात. त्यातही उन्हाळ्याच्या दिवसात वाॅटर किंगडमला मोठी पसंती दिली जाते. तिथल्या अनेक वाॅटर स्लाईड्सचं आकर्षण सगळ्यांना असतं.
पण आता या सगळ्या वाॅटर स्लाईड्सचा बाप म्हणता येईल अशी वाॅटर स्लाईड अमेरिकेत सुरू झाली आहे. ही वाॅटर स्लाईड फक्त पाण्यात उतरणाऱी घसरगुंडी नाही तर या वाॅटर स्लाईडवरून तुम्ही घसरलात की तुम्हाला ही स्लाईड सुमारे शंभर फूट वर अक्षरश: वर फेकते. आणि अशी ‘फ्लाईट’ मिळाल्यानंतर तुम्ही शंभर फुटांवरून या पाण्यात पडता. या वाॅटर स्लाईडचं नाव आहे ‘स्लिप एन् फ्लाय’. पाहा ही झिंगाट वाॅटर स्लाईड
सौजन्य- फेसबुक
अमेरिकेमधल्या एका ‘अम्युसमेंट पार्क’मध्ये ही भन्नाट वाॅटर स्लाईड आहे. ही स्लाईड दिसायला जाम भयंकर दिसते. अनेकांना एकतर पाण्याचीच भीती असते. त्यातही अशा स्लाईडवरून घसरत जायचं आणि आकाशात फेकलं देल्यावर पाण्यावर धबकन आपटायचं हे काही खायचं काम नाही.
पण ही वाॅटर स्लाईड ज्यांनी बनवली आहे त्यांनी ही स्लाईड संपूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलंय. पाण्यामध्ये चुकीच्या पध्दतीने उडी मारली गेली तर मोठी दुखापत होण्याची शक्यता असते. पण या स्लाईडवरून घसरत गेलेले सगळेजण योग्य स्थितीत पाण्यामध्ये पडत असल्याचं या व्हिडिओवरून तरी दिसतंय.
मग? जाणार का यंदा अमेरिकेत?