Train Accident Viral Video: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अत्याधुनिक स्मार्टफोन्स आणि स्वस्त इंटरनेट यांमुळे सोशल मीडियावर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आजकाल प्रत्येकजण इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा साइट्सवर सक्रिय असतो. खासकरुन तरुण मंडळी सोशल मीडियाचा जास्त वापर करताना दिसतात. गायन, नृत्य यांच्यासह चित्रकला, हस्तकला अशा कला अंगी असणाऱ्यांसाठी सोशल मीडियाची मोठी मदत होते. त्यांना आपली कला जास्तीत जास्त लोकांना पोहचण्याची संधी मिळते.
पण त्याच बाजूला या माध्यमावर चित्रविचित्र गोष्टी करुन व्हायरल होणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचेही पाहायला मिळते. व्हायरल होऊन फेमस होता यावे या एका ध्येयासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले हेच प्रयत्न काही वेळेस त्यांच्या जीवावर बेततात. व्हिडीओ बनवण्यासाठी रेल्वे रुळाजवळ गेलेल्या एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये एक मुलगा रेल्वे रुळाच्या अगदी जवळून चालत असल्याचे पाहायला मिळते. हा मुलगा चालत असताना त्याचे मित्र व्हिडीओ रेकॉर्ड करत असतात. तो मुलगा ज्या रुळाच्या शेजारी चालत असतो, त्या रुळावर एक ट्रेन वेगाने पुढे येत असते. मागून येणाऱ्या ट्रेनकडे त्या मुलाचे लक्ष नसते. तो व्हिडीओ काढण्यासाठी रुळाच्या शेजारुन चालताना व्हिडीओमध्ये दिसतो. पुढे २-३ सेकंदानंतर वेगाने येणाऱ्या ट्रेनची धडक त्या मुलाला बसते आणि तो क्षणार्धात बाजूला फेकला जातो. व्हिडीओ काढणारे त्याचे मित्र त्याच्याजवळ धावत जातात. व्हिडीओ पाहून त्या मुलाला गंभीर दुखापत झाली असल्याचा अंदाज येतो.
व्हायरल होणाऱ्या या ८ सेंकदांच्या व्हिडीओला सात लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. हजारो यूजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजणांनी हा व्हिडीओ जुना आहे असे म्हटले आहे. तर काहींनी तरुणांना रील्स, व्हिडीओ बनवताना सावधगिरी बाळगायचे आवाहन केले आहे. Loyal Roy या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता.