Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही व्हिडीओ आपला थरकाप उडवणारे असतात. या व्हिडीओंमध्ये कधी अपघाताच्या घटना, तर कधी भांडण, मारहाणी पाहायला मिळते. या मारहाणीच्या व्हिडीओंमध्ये कधी पालकांकडून मुलांना तर कधी पतीकडून पत्नीला किंवा स्वतःच्या आई-वडिलांना मारहाण करत असल्याचे दिसते. यावर नेटकरीही तीव्र संताप व्यक्त करतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन महिलांना भररस्त्यात काही पुरुषांकडून मारहाण केल्याचे पाहायला मिळत आहे.
देश एकीकडे प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करीत यशाच्या पायऱ्या चढून जात आहे, तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार, बलात्कार, शोषण, मारहाण अशा समस्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दर दिवशी देशाच्या विविध भागांतून अशा घटनांचे व्हिडीओ, फोटो सतत व्हायरल होत असतात, ज्यावर संताप व्यक्त करण्याशिवाय कोणी काहीही करत नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिला कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो. रस्त्यावरून चालताना अनेकदा महिलांना वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. आता अशीच एक घटना दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानाबाहेर दोन महिलांभोवती काही पुरुष उभे राहिले असून सुरुवातीला त्या महिला बाजूला उभ्या राहिलेल्या पुरुषांशी कोणत्यातरी विषयावरून भांडताना दिसत आहेत. त्यानंतर एक पुरुष “मारा मला मारा” असं महिलांना म्हणतो. त्यावर दोघींपैकी एक जण त्या पुरुषाला काठीने मारायला सुरुवात करते. त्यानंतर तोच पुरुष काठीने मारणाऱ्या महिलेला बेदम चोप देऊन तिला जमिनीवर पाडतो आणि लाथा मारायला सुरूवात करतो. यावेळी दुसरा पुरुष दुसऱ्या महिलेचे केस ओढतो आणि तिलाही मारहाण करायला सुरुवात करतो, त्या दोघींनाही जमिनीवर पाडून दोन्ही पुरुष बेदम मारहाण करतात, त्यांचे केस ओढून त्यांना फरपटत नेतात. यावेळी आसपास उभे असलेले इतर पुरुष या घटनेचा व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. हा भयानक प्रकार पाहून सोशल मीडियावर नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
तसेच एका युजरनं यावर लिहिलंय, “काय प्रकार आहे हा, देशात महिला सुरूक्षित नाहीत” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “भयानक प्रकार”, तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “चूक कोणाची का असेना, असं मारणं चुकीचं आहे.”