Viral Video: ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं, त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, हल्ली असं निर्मळ आणि नि:स्वार्थी प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. अलीकडच्या काळातील अनेक तरुण-तरुणींना प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करणं याच गोष्टींकडे लक्ष असतं. त्यामुळे जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी ते नातंदेखील तुटतं. पण, आपल्या आधीच्या पिढीसाठी प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून एकमेकांच्या सुख-दुःखात एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदाराला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीनं करणं, याला खरं प्रेम म्हणतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

हल्लीचा बदलणारा काळ बघता, प्रेम, लग्नं फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर वृद्ध जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये त्यांचं प्रेम पाहून आपल्यालाही हेवा वाटतो. या व्हायरल व्हिडीओमध्येदेखील असंच प्रेम पाहायला मिळतंय, जे पाहून अनेक जण व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजी-आजोबा भररस्त्यात मुसळधार पावसामध्ये एकाच छत्रीमध्ये उभे आहेत. यावेळी बराच वेळ पाऊस पडत असल्यामुळे ते एकाच जागी उभे राहतात. एकमेकांना सावरताना आणि शांतपणे उभ्या राहिलेल्या या जोडीला पाहून अनेक जण सुंदर कमेंट्स करताना दिसत आहेत. प्रेम बोलण्यापेक्षा ते कृतीतून दाखवणे खूप महत्त्वाचं आहे हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. आजी-आजोबांच्या या व्हिडीओवर “खऱ्या प्रेमाला वयाचं बंधन नसतं… जिथे आवडती व्यक्ती सोबत असते तिथे प्रत्येक क्षण खास असतो”, अशी सुंदर कॅप्शन देण्यात आली आहे.

हेही वाचा: “किती शिकला यापेक्षा शिक्षणातून काय शिकला हे महत्त्वाचं”, शाळेच्या मैदानावर कचरा गोळा करणाऱ्या चिमुकल्याने केलं असं काही… VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jayuu3111 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “शेवटी काय प्रेम होणं, राहणं आणि टिकणं महत्त्वाचं..”, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय, “दोघे जर जास्त शहाणे असतील तर नाही टिकत नातं.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय, “आयुष्यात असं प्रेम करणारी व्यक्ती हवी.”