Viral Video: सोशल मीडियावर महिलांना त्यांच्या ड्रायव्हिंगवरुन चिडवले जाते. महिला नीट गाडी चालवत नाहीत असे काहीजणांचे मत असते. अशा लोकांना अनेकदा सुनावले देखील जाते. पण काही तरुणी ‘महिलांना ड्रायव्हिंग येत नाही’ ही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होईल असे काम करत असतात. सोशल मीडियावर अशा तरुणांना ‘पापा की परी’ अशी टोपणनावे देत त्यांच्यावर मीम्स तयार केले जातात. या अतिआत्मविश्वासू तरुणींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने आपले वाईट ड्रायव्हिंग स्कील्स दाखवले आहेत.
या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला बाइक स्टॅंडवर बाइक्स, स्कूटी खाली पडलेल्या दिसत आहेत. पुढे एक गाडी दोन-तीन बाइक्सवर चढवल्याचे पाहायला मिळते. तेथे झालेल्या गर्दीमध्ये गाडी चालवणारी तरुणी उभी आहे असेही दिसते. ही तरुणी गाडी पार्क करण्यासाठी रिव्हर्स येत होती. या प्रयत्नांमध्ये तिने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बाइक्स, स्कूटींवर गाडी चढवली. हा प्रकार घडल्यानंतर आजूबाजूचे लोक एकत्र येऊन गर्दी झाली, त्यातील काहीजण त्या तरुणीवर भडकतात. पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती तरुणी आपल्या तोऱ्यामध्ये असल्याचेही पाहायला मिळते. पुढे लोकांच्या मदतीने ती गाडी त्या बाइक्सवरुन पुढे काढते.
@ItsRDil या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. बऱ्याच यूजर्संनी त्या तरुणीला तिच्या गाडी चालवण्याच्या वाईट कौशल्यांवरुन आणि एकूणच वागणूकीवरुन ट्रोल केले आहे. काही यूजर्स तिला पापा की परी म्हणत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर या शहरातला आहे. ज्या दुचाकी गाड्यांवर त्या तरुणीने आपली चारचाकी गाडी चढवली; त्या बाइक्स, स्कूटर्सच्या मालकांनी पोलीसांकडे तक्रार करत नुकसान भरपाई करवून देण्यासाठी विनंती केली आहे.