Virar local viral video: मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही. अन् त्यात जर का तुम्ही विरार लोकलनं प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको. कारण विरार ट्रेनला इतकी प्रचंड गर्दी असते की मुंगीलासुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही. अशा स्थितीत लोकं बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हाणामारी करतात. सध्या याच विरार लोकलमधला एक व्हिडीओ वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
देशात कुठे फिरायला जायचे असेल तर लोकं आरामदायी प्रवासासाठी नेहमीच भारतीय रेल्वेचा वापर करतात. भारतीय रेल्वेचा प्रवास हा तसा परवडणारा असतो. त्यामुळेच लवकर तिकीट देखील मिळत नाही. रेल्वेतून तुम्ही योग्य तिकीट घेऊन प्रवास केला तर तुम्हाला कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. पण जर चुकीचे तिकीट घेऊन प्रवास करत असाल किंवा तिकीटच काढले नसेल तर रेल्वे अशा प्रवाशांवर कारवाई करण्यापासून थांबत नाही. यासाठी रेल्वेकडून सतत जनजागृती देखील होत असते. विना तिकीट ट्रेनने प्रवास करणे चुकीचे तर आहेच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे. ज्यासाठी दंड, तुरुंगवास किंवा दोन्हीची तरतूद आहे. दरम्यान अशाच एक व्यक्तीनं रेल्वेचे तिकीट नसल्याने टीसीनं त्याला मारहाण केली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून टीसीवर टीका केली जात आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची?
नेमकं काय घडलं?
एका महिलेनं हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून त्याठिकाणी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. “दररोजसारखे, सुमारे ३ ते ४ तिकीट तपासनीस ट्रेनमध्ये बसले होते. मी बोरिवलीहून ट्रेनमध्ये चढले आणि काही वेळातच, टीसींनी तिकिटे तपासायला सुरुवात केली. यावेळी लाल शर्ट घातलेला एक माणूस दाराजवळ उभा होता कारण तो घाबरलेला दिसत होता आणि त्याच्याकडे तिकीट नव्हते. एक टीसी त्याच्या शेजारी उभा राहिला आणि त्याच्याशी बोलू लागला. सुमारे दोन मिनिटांनंतर, संभाषण वाढले. तिकीट नसल्यानं टीसीने त्या माणसाला मारायला सुरुवात केली आणि अचानक, दोघेही एकमेकांना मोठ्याने शिवीगाळ करू लागले. काही सेकंदातच, टीसीने लाल शर्ट घातलेल्या माणसाला जोरात कानाखाली मारली, फक्त एकदाच नाही तर तीन ते चार वेळा. मी सुरुवातीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही कारण मी खूप घाबरले होते.
त्यानंतर आणखी टीसी आले, यावेळी एकाने त्या माणसाला घट्ट धरले होते तर दुसरा त्याला मारत होता. व्हिडिओमध्ये, दुसऱ्या प्रवाशाशी वाद घालणारा टीसी हाच आहे ज्याने त्या माणसाला कानाखाली मारली होती. यावेळी काही प्रवाशांना हस्तक्षेप केला आणि टीसीला सांगितले की अशाप्रकारे हात उचलायला नको होता. यावेळी त्यांच्यावरही टीसी ओरडताना दिसले. ही घटना दुपारी ३:२७ वाजता विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये, ४:१४ वाजता घडली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ andheriwestshitposting नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संतापले असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हंटलंय, “अशाप्रकारे कायदा हातात घ्यायचा यांना काही अधिकार नाही” तर आणखी एकानं, “टीसीनं कायदेशीर कारवाई करायला हवी होती” अशी प्रतिक्रिया दिली आहे.