Virar Local Woman Fight Video : राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या नावाखाली कार्यकर्त्यांकडून दादागिरी, गुंडगिरी केली जात असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. यात काही दिवसांपूर्वी नेत्यांचे नाव घेत सर्वसामान्यांना मारण्याचे, धमकावण्याचे, खंडणी वसूल करण्याचे प्रकारही राज्यात घडले, ज्यामुळे सर्वसामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यात विरार लोकलमधील दादागिरी काही नवीन नाही. दरम्यान, विरार लोकल ट्रेनमध्ये १७ एप्रिल रोजी सायंकाळी राज्य महिला आयोगप्रमुख रुपाली चाकणकरांचे नाव घेत दुसऱ्या महिला सहप्रवाश्याला धमकावल्याची, मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत एका महिलेने दुसऱ्या महिलेला मारहाण करत धमकावले; यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ लोकसत्ता डॉट.कॉमने आपल्या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केला आहे, जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेत रिकाम्या सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला. यावेळी एका महिलेने मी मंत्रालयात अँटी करप्शन ब्युरोमध्ये कामाला आहे असा दावा करत माझ्या नादाला लागू नकोस अशी धमकी देत दुसरीला अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर वाद इतका पेटला की, दोघींनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या वादादरम्यान पहिल्या महिलेने दुसरीला राज्य महिला आयोगप्रमुख रुपाली चाकणकर यांचे नाव घेत धमकावण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
नेमकी घटना काय?
चर्चगेट रेल्वेस्थानकावरून १७ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.४० च्या विरार महिला विशेष ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली. मोटरमन केबिनच्या अगदी मागच्या डब्यात ट्रेन सुटण्याच्या काही सेकंद अगोदरच दोन महिलांमध्ये रिकाम्या सीटवर बसण्यावरून भांडणास सुरुवात झाली.
नेहमीप्रमाणेच चर्चगेट स्थानकावरून विरार लेडीज स्पेशल ट्रेन गर्दीने भरली, या गर्दीत ट्रेन सुटण्यास अवघे काही सेकंद असताना एक महिला चढली, दोन महिलांच्या मधील सीट रिकामी दिसल्याने ती घाईघाईत बसण्यास तिथे आली, पण बसण्यापूर्वी तिने कॉर्नर सीटवर बसलेल्या महिलेला ‘इथे कोण बसलंय का’ असे विचारले. पण, ती महिला भेळ खात असल्याने तिला उत्तर देता आलं नाही, ज्यावर दुसऱ्या महिलेने काकी सांगा कोण बसलंय का? असं वैतागून विचारलं आणि तोंडातल्या तोंडात काही पुटपुटत ती सीटवर बसली. हे ऐकून पहिली महिला वैतागली आणि तिने “तुला मला विचारण्याचा अधिकार काय, खाणाऱ्या व्यक्तीला कधी असं रोखयचं नाही, कायदा, नियम वाचून ये” असं काहीच्या काही बोलण्यास सुरुवात केली; यानंतर जोरजोरात भांडणास सुरुवात झाली.
लाथ मारली, तोंडावर ओरबाडले अन्…
पहिल्या महिलेने दुसरीला आई-बहिणीवरून अतिशय खालच्या पातळीच्या शिव्या देण्यास सुरुवात केली. यावर संतापून दुसऱ्या महिलेने तिला पाठीवर एक जोरात चापट लगावली. यावर भडकून पहिली महिला जागेवरून उठली आणि तिनेही तिला मारहाण करण्यास सुरुवात केली, तिने दुसऱ्या महिलेचे जोरात केस ओढले, ज्यावर प्रतिकार म्हणून दुसरीने तिला लाथ मारली आणि तोंडावर ओरबाडले, अखेर काही महिलांनी मध्यस्थी करत दोघींचे भांडण सोडवले.
”व्हिडीओ काढ आणि कोणत्या कलेक्टरला पाठवायचा आहे त्याला पाठव”
पण, त्यानंतरही पहिली महिला जोरात शाब्दिक भांडण करतच होती. व्हिडीओमध्ये ऐकू शकता की, पहिली महिला बोलतेय की, “मी भेळ खात असताना माझा खाण्याचा अधिकार हिरावून घेत पटरपटर करतेय, पहिलं मला मारलं कोणी?”, यावर दुसरी महिला उत्तर देते, “घाणेरड्या शिव्या देण्यास तुम्ही सुरुवात केली, माझ्या आई-वडिलांवरून शिव्या देशील आणि मी ऐकून घेऊ”, यावर संतापून पहिली महिला म्हणते की, “व्हिडीओ काढ आणि कोणत्या कलेक्टरला पाठवायचा आहे त्याला पाठव, घाबरत नाही.” नंतर ती महिला राज्य महिला आयोगप्रमुख रुपाली चाकणकर यांचे नाव घेत म्हणते की, “XXX XXXXX म्हणतात मला, रुपाली चाकणकरांचं नाव ऐकलं का, मी त्यांची कार्यकर्ती आहे.”
“झोपताना आणि खाताना कोणाला उठवू शकत नाही, तुझ्यावर केस होऊ शकते”
नंतर गलिच्छ भाषेत शिवीगाळ सुरूच ठेवते. यावर दुसरी महिला संतापून सवाल करते की, रुपालीताई चाकणकर अशा बोलतात का? ज्यावर पहिली महिला, “त्या अशा नाही म्हणत, त्या खाता-खाता कोणाला उठवत नाहीत, तुला थोबडा शांत ठेव म्हटलं होतं, जरा कायदा वाच, झोपताना आणि खाताना कोणाला उठवू शकत नाही, तुझ्यावर केस होऊ शकते” अशी धमकी देते. याचदरम्यान ती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या सहीचे एक पत्र हात वर करून दाखवत शिवीगाळ करणं सुरूच ठेवते, यादरम्यान ती दुसऱ्या महिलेला चक्क जीवे मारण्याची धमकीदेखील देते. पण, तिच्या घाणेरड्या शिव्यांना आणि धमक्यांना कंटाळून दुसरी महिला सीटवरून उठून दुसरीकडे निघून जाते.
संबंधित महिलेवर कडक कारवाईची मागणी
या घटनेनंतर दादर स्थानकात रेल्वे पोलिस ट्रेनमध्ये चढले, मात्र तोपर्यंत भांडण शांत झाल्याने ते निघून गेले. मात्र, दादर येईपर्यंत पहिल्या महिलेचे अर्वाच्च भाषेत बोलणं, धमक्या देणं काहीवेळ सुरूच होतं; पण विरार लोकलमध्ये रोजच अशी भांडणं, मारहाण, धक्काबुक्कीच्या घटना घडत असतात, पण अशाप्रकारे ट्रेनमध्ये एखाद्या राजकीय नेत्याच्या नावाने धमकावत, शिवीगाळ, मारहाण करणं अतिशय धक्कादायक बाब असल्याचे म्हणत संबंधित महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी लोक करत आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ तुम्ही लोकसत्ताच्या सोशल मीडिया वेबसाईटवर पाहू शकता.
या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी राज्य महिला आयोग प्रमुख रुपाली चाकणकर यांनी या घटनेची दखल घेत संबंधित महिलेवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कोणाचेही नाव घेऊन दादागिरी व गलिच्छ भाषेत शिव्या देणे चुकीचे आहे, कार्यकर्ती आहे म्हणून दादागिरी करणार का? असा सवालही काही जण उपस्थित करत आहेत.