यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कामगिरी कमालीची उंचावली असून भारतच जेतेपदाचा दावेदार मानला जात आहे. येत्या रविवारी, अर्थात १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल. भारतीय संघाच्या या कामगिरीत भारताचा माजी कर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीच्या धावांचा मोठा वाटा राहिला आहे. याच स्पर्धेत विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरला मागे टाकत कारकिर्दीतलं ५०वं एकदिवसीय शतक झळकावलं आहे. त्याच्या या कामगिरीसाठी त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत असलं, तरी त्याच्या विक्रमाचं भाकित तब्बल ११ वर्षांपूर्वीच करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.
विराट कोहलीनं या विश्वचषकात आत्तापर्यंत तीन शतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरनं कारकिर्दीत ४९ एकदिवसीय शतकं झळकावली होती. आता विराट कोहलीनं त्याचा विक्रम मोडत ५० शतकं नावावर केली आहेत. विराट कोहली अजूनही खेळत असून शतकांचा हा विक्रम आणखी मोठा होण्याची शक्यता आहे. मात्र, २०१२ साली विराट कोहलीनं १२वं एकदिवसीय शतक झळकावलं तेव्हाच त्याच्या ५०व्या शतकाचं भाकित वर्तवण्यात आलं होतं!
नेमका काय आहे प्रकार?
सध्या समाजमाध्यमांवर २०१२ सालच्या एका फेसबुक पोस्टचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जॉय भट्टाचार्ज्य या व्यक्तीने एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट केली असून त्यात शिजू बालानंदन नावाच्या व्यक्तीच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. २२ जुलै २०१२ रोजीची ही फेसबुक पोस्ट आहे. “खेळाबद्दल आणि आमच्याबद्दल. जुलै २०१२ला विराट कोहलीनं १२वं एकदिवसीय शतक झळकावल्यानंतर शिजू बालानंदननं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं की त्याचा आदर्श ५० शतकं झळकावेल. विराटच्या ३३व्या शतकापर्यंत शिजूनं ही मोजणी सोशल मीडियावर शेअर केली. पण त्यानंतर शिजू आम्हाला सोडून गेला. त्याच्या मित्रांनी हे काम पुढे चालू ठेवलं. आणि काल शिजूचं भाकित खरं ठरलं!” असं या पोस्टमध्ये जॉयनं म्हटलं आहे.
शिजू बालानंदन यांची ‘ती’ पोस्ट!
शिजू बालानंदन यांच्या ११ वर्षांपूर्वीच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट आता व्हायरल होऊ लागला आहे. “विराट कोहली एकदिवसीय शतकांचा सचिनचा विक्रम मोडेल”, अशी एका वाक्याची पोस्ट शिजू बालानंदन यांनी २२ जुलै २०१२ रोजी केली होती. वानखेडेवर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारतानं विजय मिळवला. याच सामन्यात विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ५०वं शतक झळकावून त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडला.