गेल्या दोन दिवसांपासून आयपीएल २०२३ सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर, तसेच विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात झालेल्या वादावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. सामन्यानंतर झालेल्या वादामुळे या दोघांना सामन्याच्या मानधनाच्या १०० टक्के दंडही ठोठावण्यात आला होता. एकीकडे या दोघांच्या वादावर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत असताना दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी या दोघांमधल्या वादाचा ‘गैरफायदा’ घेतल्याची खुमासदार चर्चा नेटिझन्समध्ये रंगली आहे!
नेमकं घडलं काय?
आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपरजाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान आधी विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात वादावादी झाली. दोघांमधली ‘शाब्दिक देवाण-घेवाण’ एवढी वाढली की दोन्ही बाजूचे खेळाडू आणि पंचांना मध्यस्थी करावी लागली. यावरून सामन्यानंतर विराट कोहली आणि लखनौचा कोच गौतम गंभीर यांच्यातही वाद झाला. या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आलं. यासंदर्भात बीसीसीआयनं विराट आणि गंभीरला सामन्याच्या मानधनाच्या १०० टक्के तर नवीन उल-हकला ५० टक्के दंड ठोठावला.
हे प्रकरण क्रीडाविश्वात चर्चेचा विषय ठरलेलं असतानाच सामाजिक जीवनात त्याचा आधार घेत उत्तर प्रदेश पोलिसांनी भन्नाट क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. त्यांच्या क्रिएटिव्हिटीची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
“आमच्यासाठी कोणतीच समस्या विराट वा गंभीर नाही!”
उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या इमर्जन्सी हेल्पलाईन क्रमांकाची जाहिरात किंवा लोकांना त्याचा वापर करण्याचं आवाहन करण्यासाठी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातल्या वादाचा आधार घेतला आहे. “वादापासून लांब राहा, आम्हाला कॉल करण्यापासून नाही. कोणत्याही संकटसमयी ११२ डाएल करा”, असं आवाहन उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यात गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या वादाचा प्रसंग दिसत असून त्यावर उत्तर प्रदेश पोलिसांचा संदेश आहे.
“आमच्यासाठी कोणतीच समस्या ‘विराट’ आणि ‘गंभीर’ नाही. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने ११२ डाएल करा” असं या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या ट्वीटवर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.