पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी (२९ मे २०२२ रोजी) सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूसा या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला प्रचंड जनसमुदाय उसळला होता. यावेळी त्यांच्या आई वडिलांचं दु:ख अनावर झाल्याचं पहायला मिळालं. एवढ्या लहान वयामध्ये मुलाला अशापद्धतीने गमावल्याने मुसेवाला यांच्या आईवडील मुलाला शेवटचा निरोप देताना रडत असल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेकांनी या दोघांचे फोटो फारच वेदनादायी असल्याचं म्हटलंय. भारताचा माजी फलंदाज आणि मूळचा पंजाबी असणाऱ्या विरेंद्र सेहवागनेही मुसेवाला यांच्या आईवडीलांचा फोटो शेअर करत सहानुभूती व्यक्त केलीय.
नक्की वाचा >> विश्लेषण : १८ लाखांचे दागिने, ५ कोटी बँकेत, २६ लाखांची कार अन्… सिद्धू मुसेवालांकडे एकूण किती संपत्ती होती?
आईवडिलांनी केली चाहत्यांच्या जेवणाची सोय
मुसेवाला यांचे विविध राज्यांतील चाहते त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. मूसा हे गाव मन्सा जिल्ह्यात आहे. २७ वर्षीय सिद्धू मुसेवाला यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी विविध भागांतील लोक मूसा गावाकडे निघाल्याने मंगळवारी त्या भागातील रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. त्यामुळे दूरवरून लोक पायी चालत भर उन्हात मूसा गावाकडे निघाले. पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. अंत्यसंस्कारासाठी जमलेले चाहते काही तास ताटकळत राहिल्यानंतर मूसेवाला यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी जेवण आणि पेयजलाची व्यवस्था केली. मुसेवाला यांच्या घराबाहेर प्रचंड संख्येने जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना आवरण्यासाठी सुरुवातीला पोलिसांना लाठीमारही करावा लागला. मुसेवाला यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांची आई पूर्णवेळ पार्थिवाजवळच उभी होती. तर बाजूलाच उभ्या असणाऱ्या मुसेवाला यांच्या वडिलांची लोक येऊन सांत्वना करत होते.
सोयरिक जमविण्याच्या प्रयत्न सुरु होता…
सिद्धू मूसेवाला यांचे वडील बलकौरसिंग आणि आई चरणकौर सिद्धू यांना सातत्याने अश्रू अनावर होत होते. पंजाबमधील प्रथेनुसार अविवाहित सिद्धू मुसेवाला यांना अंतिम निरोप देताना त्यांच्या पार्थिवावर नवरदेवासारखा पोशाख चढविण्यात आला होता. मूसेवाला कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू यांची हत्या होण्याच्या दोन दिवस आधीपर्यंत त्यांचे आईवडील सिद्धू यांची सोयरिक जमविण्याच्या प्रयत्नात होते.
आईने मुलाला सेहरा बांधला, वडिलांनी त्याच्या मिशांना पीळ भरला..
सिद्धू यांची आई ही गावची सरपंच असून त्यांनी सिद्धू यांचे केस विंचरून त्यांच्या डोक्याला पगडी बांधून सेहरा चढवला. सिद्धू यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मिशांना पीळ भरला. गायक सिद्धू हे त्यांच्या आल्बममध्ये मिशीवर ताव मारताना अनेकदा दिसतात. इतकेच नव्हे तर प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्यासाठी पहिलवान जशी मांड ठोकतो, तशी मांडही सिद्धू यांच्या वडिलांनी पार्थिवाच्या मांडीवर आपल्या हाताने ठोकली.
सेहवागही गहिवरला…
मुसेवाला यांच्या आईवडिलांचे हेच फोटो शेअर करत विरेंद्र सेहवागने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिलीय. “आई-वडिलांच्या या वेदनांचं वर्णनही करता येणार नाही. लहान वयात आपल्या मुलाला अशाप्रकारे जग सोडून गेल्याचे दु:ख कोणत्याही आईला वडिलांना मिळू नये. वाहेगुरु कुटूंबियांना बळ देवो,” अशा कॅप्शनसहीत सेहवागने मुसेवाला यांच्या आईवडिलांचे फोटो शेअर केलेत.
मुसेवाला यांचं पार्थिव वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला वरातीच्या कारप्रमाणे सजविण्यात आले होते. चाहत्यांच्या घोषणा अखंड सुरू होत्या.