गायी-म्हशी पाळणाऱ्या आणि दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दुधाळ जनावरांची किंमत बाजारात सर्वाधिक आहे. ही जनावरे खरेदीदार चांगल्या भावाने विकत घेतात. मात्र जे गरीब आहेत आणि दुधाचा व्यापार करू इच्छितात त्यांना महागडी जनावरे खरेदी करणे कठीण असतं. आपल्या जनावरांना चांगला डोस देऊनही, जर तुमची गाय किंवा म्हैस योग्य प्रकारे दूध देत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टर्कीतील एका शेतकर्याचे एक तंत्र दूध उत्पादन वाढवण्यास मदत करेल. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला चांगला नफा देखील मिळेल. टर्कीच्या शेतकऱ्याने आपली गाय हायटेक केली आहे. याचा फायदा शेतकऱ्याला झाला असून गाय ५ लिटर जास्त दूध देऊ लागली आहे.
टर्कीतील अक्साराय येथील शेतकरी इज्जत कोकाकने आपल्या गायीला व्हर्च्युअल रिअॅलिटी गॉगल लावला. त्यामुळे गायींना डोळ्यासमोर मोकळ्या हिरवळीचे दृश्य दिसू लागले. यामुळे गायीला एका मोठ्या शेतात चरत असल्याचा भास होतो. मात्र प्रत्यक्षात तसे नसून शेतकऱ्याने गायी गोठ्यात किंवा घराजवळील खुंटीला बांधून ठेवलेल्या असतात. या तंत्राचा फायदा इतर शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनीही त्याचा अवलंब केला. एका अभ्यासातून असेही समोर आले आहे की, गायी आणि म्हशी जेव्हा हिरवेगार शेत पाहतात तेव्हा त्या सरासरीपेक्षा जास्त दूध देतात.
गायीच्या डोळ्यांवर व्हीआर गॉगल लावल्याने त्यांना खूप फायदा झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचे दूध उत्पादन वाढले आहे. शेतकऱ्याने सांगितले की, “पूर्वी गाय २२ लिटर दूध देत होती, आता ती २७ लिटर दूध देते. जनावरांना व्हीआर चष्म्यातून हिरवे शेत दिसते आणि ते पाहून त्यांना शेतात चरल्यासारखे वाटते. त्यामुळे त्यांच्या दुधात आणखी वाढ होते. आजूबाजूचे शेतकरीही आपल्या गाई-म्हशींवर असे प्रयोग करत असून त्यांना त्याचा भरपूर फायदा होत आहे. दुधाचे उत्पादन जास्त असल्याने त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.