सोशल नेटवर्किंगवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये लग्नाच्या पंगतीमधील वाढपी मंडळी चक्क पीपीई कीट घालून जेवण वाढताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आंध्र प्रदेशमध्ये पार पडलेल्या एका लग्न समारंभातील आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार आंध्र प्रदेशमधील मुंडनीपल्ली गावामध्ये २२ जुलै रोजी पार पडलेल्या लग्न समारंभातील हा व्हिडिओ आहे.

कृष्णा जिल्ह्यातील गुंडीवाडा येथील कोटी कॅटरर्सला करोना लॉकडाउननंतर तीन महिन्यांना पहिल्यांदाच लग्नासमारंभासाठी जेवणाचे कंत्राट मिळाले. लग्नाला आलेल्यासाठी दीडशे ते दोनशे प्लेट जेवणाची ऑर्डर कोटी कॅटरर्सला मिळाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नाचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी कॅटरर्सची सर्व माणसे ही पीपीई कीटमध्ये असतील यासंदर्भात सूचना कॅटरर्सला केल्या. स्वच्छता राखण्याबरोबरच खाणं वाटप करणाऱ्या सर्वांनी पीपीईमध्ये असावे अशी आयोजकांची मागणी होती. आधीच बऱ्याच दिवसांनी कंत्राट मिळालं असल्याने कॅटरर्सने तातडीने या मागणीला होकार दिला. स्वच्छता आणि पीपीईबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांच्या शरीराचे तापमान तपासण्यात आलं. सर्व गोष्टी सॅनिटाइज करुन घेण्यात आल्या होता. या सर्वानंतरच उपस्थित पाहुण्यांना पीपीई कीट घातलेल्या वाढप्यांनी जेवण वाढलं. वऱ्हाड्यांना जेवण वाढल्यानंतर, पंगती संपल्यानंतर सर्व पीपीई कीटची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

आंध्र प्रदेशमध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वाधिक करोनाबाधित असलेल्या पाच अव्वल राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लग्न समारंभ आयोजित करता येणार नाही असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहे. श्रावण महिना हा आंध्र प्रदेशमध्ये लग्नसराईचा काळ अशतो. त्यामुळेच केवळ जिल्हाधिकाऱ्यांवर ताण येऊ नये म्हणून आता तहसीलदारांनाही लग्न समारंभासंदर्भात परवानगी देण्याचे हक्क राज्य सरकारने दिले आहेत.

Story img Loader