Ward Boy Viral Video: दवाखान्यामध्ये कधी काय घडेल, याचा नेम राहिलेला नाही. रुग्णांशी अभद्र व्यवहाराच्या घटना सध्या सामान्य झाल्या आहेत. अशातच शनिवारच्या एका घटनेत मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार घडला. अपघातात दगावलेल्या एका तरुणीच्या कानातील सोन्याचे कानातले चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कुठे घडली घटना

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका वॉर्डबॉयला रुग्णालयात दाखल असलेल्या मृत तरुणीच्या सोन्याचे कानातले चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो माणूस गुन्हा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये वॉर्डबॉय तरुणीच्या कानातून काहीतरी काढताना दिसत आहे आणि तिचे शरीर हलवण्याचे नाटक करीत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, २६ वर्षीय श्वेता असे या मृत तरुणीचे नाव आहे. अपघातात जखमी झालेल्या या तरुणीला शनिवारी रुग्णालयात दाखल केले जात असतानाच तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

वृत्तानुसार, जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर आहुजा म्हणाले, “अपघातानंतर पोलिसांनी तरुणीचा मृतदेह आपत्कालीन वॉर्डमध्ये पाठवला. पोलिसांनी मृतदेह सील करायला सुरुवात केली तेव्हा तरुणीचे सोन्याचे कानातले गायब असल्याचे आढळले. तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये वॉर्डबॉय विजयने कानातले चोरल्याचे उघड झाले.”

आरोपीला अटक

या घटनेनंतर मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात निदर्शने करीत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. विजय नावाचा वॉर्डबॉय गुन्हा केल्यानंतर रुग्णालयातून पळून गेला होता; परंतु रविवारी त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून त्याने चोरलेले सोन्याचे कानातले जप्त केले आहेत आणि त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू केला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

३ एप्रिल रोजी अशाच एका घटनेत, दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतिगृहातून मौल्यवान वस्तू चोरल्याबद्दल ४३ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली होती. ती महिला डॉक्टरांचा कोट घालून रुग्णालय आणि वसतिगृह परिसरात डॉक्टर असल्याचे भासवून फिरल्याचा आरोप तिच्यावर आहे.

डॉक्टरांच्या खोलीतून सोन्याचे दागिने, २०,००० रुपये रोख आणि ७०० मलेशियन रिंगिट चोरीला गेल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितल्यानंतर तिला अटक करण्यात आली. अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणि सखोल तपासानंतर पोलिसांनी गाझियाबादमधील महिलेच्या निवासस्थानी छापा टाकला आणि चोरीचे दागिने जप्त केले.