Viral Photo of dog Walks 200 Km From Pandharpur To Reunite With Owner: सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका श्वानाने मालकाला भेटण्यासाठी चक्क राज्याची सीमा ओलांडली. हा हृदयस्पर्शी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेळगाव येथील एका फेसबुक पेजने ही घटना उघडकीस आणली आणि असं नमूद केलं की, पंढरपूरला वारकरी माणसांबरोबर आलेला आणि आषाढी एकादशीला गर्दीत हरवलेला श्वान सुमारे २०० किलोमीटर अंतर चालून घरी पोहोचला.

व्हायरल फोटो (Viral Photo)

“पंढरपूरमधील आषाढी यात्रेदरम्यान हरवलेल्या एका निष्ठावान श्वानानं कर्नाटकातील यमगर्णी या आपल्या गावी २०० किलोमीटर चालत जाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. ‘Allaboutbelgaum’ या फेसबुक पेजवरून हा फोटो व्हायरल झाला आहे. त्यानंतर बेळगावी जिल्ह्यातील प्राणी कल्याण संघटनेने या श्वानाचा फोटो ऑनलाइन शेअर केला.

https://www.facebook.com/photo?fbid=1064558405268823&set=a.818523189872347

गावकरी आणि त्याचे मालक ज्ञानदेव कुंभार हे श्वानाला प्रेमाने महाराज म्हणून हाक मारतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पंढरपूर येथील यमगर्णी ते विठोबा मंदिरापर्यंतच्या पायी दिंडीत कुंभार सहभागी झाले होते. कुंभार यांच्याबरोबर त्यांचा पाळीव श्वान महाराजही संपूर्ण अंतर पायी चालत गेल्याची माहिती मिळाली, मात्र, तीर्थक्षेत्रातील गर्दीत तो हरवला. सर्व प्रयत्न करूनही कर्नाटकातील गावी परतताना कुंभार यांना त्यांचा पाळीव श्वान सापडलाच नाही. पण, नंतर आश्चर्याची बाब म्हणजे तो श्वान जणू एखादा ईश्वरी चमत्कार घडल्याप्रमाणे संपूर्ण अंतर चालून परत त्याच्या मालकाकडे स्वगृही परतला.

ज्या दिवशी कुंभार यांनी पदयात्रा व दर्शनाची सांगता झाल्यावर परतण्याचा बेत केला, त्या दिवशी ते ‘महाराजा’शिवाय घरी गेले. घरी परतल्यावर त्यांना श्वान शेपूट हलवत त्यांच्या घराच्या गेटवर उभा असलेला दिसला. २८ जुलै रोजी श्वान स्वतःहून गावात परतल्याचं फेसबुक पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचा… Viral Video: हद्दच झाली! चपलेनं तोंडावर मारलं अन्…,दिल्ली मेट्रोमध्ये झालेली हाणामारी पाहून बसेल धक्का

“सर्वांना आश्चर्यचकित करून, हा श्वान काल यमगर्णीत दिसला. त्याने पायीच लांबचा प्रवास केला. याला दैवी चमत्कार म्हणत गावकरी आनंदी झाले”, असं कॅप्शन या व्हायरल पोस्टला देण्यात आलं आहे.

“हा एक चमत्कार आहे की, श्वानाला त्याचा मार्ग सापडला. आम्हाला वाटतं की, भगवान पांडुरंगानंच त्याला मार्गदर्शन केलं,” कुंभार यांनी इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचा… Viral Post: “असा कोणाचा फोन बघायचा नसतो”, चिमुकल्याने केला अनोळखी तरुणीला फोटो दाखवण्याचा हट्ट; पुढे जे घडलं ते पाहून व्हाल थक्क

दरम्यान, ‘महाराज’ परत आल्यानं गावकरी भारावून गेले. त्यानंतर त्यांनी विठ्ठल मंदिरापासून कुंभार यांच्या घरापर्यंत जल्लोषी मिरवणूक काढली.