Drinking Water Cannot Be Used For Washing Vehicles : आपल्यातील अनेकांच्या घरी २४ तास पाणी, तर काही ठिकाणी फक्त दोन किंवा अगदी दिवसातून एकदाच पाणी येते. ज्यांच्याकडे दिवसातून फक्त एकदाच पाणी येते त्यांना अंघोळीसाठी व पिण्यासाठी वेगवेगळे पाणी साठवून ठेवावे लागते. तर दुसरीकडे ज्यांच्या घरी २४ तास पाणी येते ती मंडळी तर अगदी पाण्याचा नको तसा वापर करताना दिसतात. काही जण तर रस्त्यावर गाड्या धुण्यासाठी, बागकाम, रस्ते धुण्यासाठी तसेच अगदी शौचालयासाठी पिण्याचे पाणी वापरताना दिसतात.
तर बीडब्ल्यूएसएसबीने पाण्याच्या वापराबाबत एक नोटीस जारी केली. बेंगळुरूमध्ये कार धुणे, बागकाम आणि मोठ्या बांधकाम प्रकल्पांमध्ये पिण्याचे पाणी वापरल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याचे या नोटिशीमध्ये माहिती देण्यात आली होती. म्हणजेच येत्या काही महिन्यांत पाणीटंचाईच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर बीडब्ल्यूएसएसबीने (BWSSB) हा निर्देश जारी केला आहे. दैनंदिन प्रवाशांसह अंदाजे १.४ कोटी रहिवासी असलेल्या बेंगळुरू शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
तापमान कमी होत असताना शहरात भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे, त्यामुळे अपव्यय रोखणे आणि पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करण्यास जनतेला प्रोत्साहित करणे अत्यावश्यक आहे, असे बीडब्ल्यूएसएसबी अधिकाऱ्याने सांगितले. बांधकाम, सजावटीचे कारंजे आणि कमर्शियल एस्टाब्लिशमेंट जसे की सिनेमा हॉल, बागकाम यांचा वापर आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक हितासाठी जारी केलेल्या या आदेशानुसार, बेंगळुरू पाणीपुरवठा आणि सांडपाणी कायदा १९६४ च्या कलम ३३ आणि ३४ अन्वये, बीडब्ल्यूएसएसबीने बेंगळुरू शहरात पिण्यायोग्य पाण्याचा वापर वाहने, बागकाम, इमारती आणि रस्ते बांधण्यासाठी, मनोरंजनासाठी किंवा कारंजेसारख्या सजावटीसाठी वापरण्यास प्रतिबंधित केले आहे.
बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ (BWSSB) ने वाढत्या तापमानामुळे आणि अलीकडच्या दिवसात अपुऱ्या पावसामुळे भूजल पातळीत घट झाल्यामुळे रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बीडब्ल्यूएसएसबीने पाण्याचा अपव्यय रोखण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि जनतेने पाण्याचा योग्य वापर करणे अनिवार्य केले आहे. बेंगळुरू शहराला पाणीटंचाईच्या वाढत्या चिंतेचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी बीडब्ल्यूएसएसबीचे आवाहन योग्य त्या ठिकाणी योग्य पाणी वापराची गरज अधोरेखित करते आहे.