करोनाच्या दोन लाटांचे तडाखे बसूनही अनेक जण लसीकरणाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. अशा नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी तामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्यात एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. इथे करोनावरील लसीचा डोस घेणाऱ्या नागरिकांना वॉशिंग मशीन आणि मिक्सर सारखे बंपर गिफ्ट्स देण्यात येत आहेत.

जगभरात पसरलेल्या करोना महासाथीला अटकाव करण्यासाठी देशामध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. काही राज्यात लसीकरण मोहिमेचे चांगले परिणाम समोर आले आहेत. सध्या करोना बाधितांचा दर कमी झाला आहे. लसीकरणात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी विविध प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत. नागरिकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रशासन कोणतीही कसर सोडत नाही. तामिळनाडूच्या करूर जिल्हा प्रशासनाने तर चक्क लस घ्या अन् वॉशिंग मशीन आणि मिक्सरसारखे बंपर गिफ्ट्स मिळवा, अशी ऑफरच दिलीय. येत्या रविवारी करूर जिल्हा प्रशासन मेगा लसीकरण मोहिम राबवणार आहे. या मेगा लसीकरण मोहिमेत लस घेतल्यानंतर वॉशिंग मशीन, मिक्सर, प्रेशर कुकर किंवा इतर भांडी आणि मोठ मोठ्या वस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे.

१८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण करण्यासाठी राज्यात आयोजित करण्यात येणारी ही पाचवी मेगा लसीकरण मोहिम आहे. विशेष म्हणजे, येत्या रविवारी लसीकरणासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर लकी ड्रॉ घेणार आहेत. यात घरगुती उपकरणांसह इतर मोठ मोठ्या वस्तू बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. करूरचे जिल्हाधिकारी टी. प्रभू शंकर यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.

या लकी ड्रॉमध्ये वॉशिंग मशीन हे पहिले बक्षीस आहे, तर दुसरे बक्षीस वेट ग्राइंडर आणि तिसरे बक्षिस मिक्सर ग्राइंडर ठेवण्यात आले आहे. या मोहिमेत प्रेशर कुकरसह आणखी एकूण २४ मोठ्या वस्तू भेट म्हणून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आणखी १०० वस्तू उत्तेजनार्थ बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आले आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे २५ पेक्षा जास्त लोकांना शिबिरात आणणाऱ्या स्वयंसेवकांना सुद्धा लकी ड्रॉमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.

तुम्हीदेखील Covid-19 वरील लस घेतली असेल, किंवा लवकरच घेणार असाल तर तुम्हाला बंपर गिफ्ट् मिळवण्याची संधी आहे. देशाला कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व समजल्याने करूर जिल्हा प्रशासन अशाप्रकारे प्रयत्न करत आहे. करूर जिल्ह्यात सुरू केलेल्या या अनोख्या ऑफरचं राज्याचे आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम यांनी कौतुक केलंय. IANS शी बोलताना आरोग्य मंत्री सुब्रमण्यम म्हणाले, “हा एक चांगला प्रयत्न आहे. लसीकरण शिबिरांचे यश हे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दिलेल्या समर्थनामुळेच आहे.”

त्यामुळं आपणही लवकरात लवकर लसीकरण करून घेऊन या संकटाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.

Story img Loader