भारताचा लढवय्या जवान विंग कमांडर अभिनंदन यांची शुक्रवारी (१ मार्च २०१९) पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका झाली. भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर जेट विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. हवेतल्या या लढाईत त्यांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमानही पाडले. ते भारतात परत आल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईटवरुन आनंद व्यक्त केला आहे. अभिनंदन यांच्या शौर्याचे सध्या सगळीकडे कौतुक सुरु आहे. त्यातच आता आपल्या उत्पादनांबरोबरच भन्नाट जाहिरातींसाठी लोकप्रिय असणाऱ्या ‘अमूल’नेही अभिनंदन यांना आगळ्या वेगळ्या शैलीत सलाम केला आहे.

अभिनंदन यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी अनेक तरुणांनी त्यांच्यासारख्या मिशा ठेवण्यास सुरुवात केली आहे. मूळचे बंगळरुमधील असणाऱ्या अभिनंदन यांच्या मिशांचा ट्रेण्ड त्यांच्या शहरामध्ये दिसून येत आहे. देशातील अनेक शहरांमधील तरुणांनी त्यांच्यासारख्या मिशा ठेवत त्यांना सलाम केला आहे. ‘अमूल’नेही आपल्या जाहिरातींमधून अभिनंदन यांच्या व्यक्तीमत्वाला भारदस्तपणा देणाऱ्या मिशांबद्दलच एक जाहिरात तयार करत त्यांना सलाम केला आहे.

या व्हिडीओमध्ये अनेक पुरुष वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मिशा ठेवताना दाखवण्यात आले आहे. अगदी सलून पासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण या व्हिडीओमध्ये आपल्या मिशांना मिळ देताना दिसतात. या व्हिडीओच्या शेवटी एक मुलगी ग्लासभर दूध पिताना दाखवण्यात आली आहे. दूधाचे ग्लास खाली ठेवल्यानंतर तिच्या ओठांवर दूधाच्या फेसामुळे तयार झालेल्या मिशा दिसून येतात. या व्हिडीओच्या शेवटी ‘मूछ नही तो कुछ नाही’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. एक मिनिट ९ सेकंदाचा हा व्हिडीओ ‘अमूल’ने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन ट्विट केली आहे. ‘अमूल’कडून अभिनंदनसाठी ही खास ‘अमूल मिशी’ अशा आशयाची कॅप्शन या व्हिडीओसाठी लिहीण्यात आली आहे.

नक्की वाचा >> पडद्यावरच्या हिरोंपेक्षा आता खऱा हिरो ‘अभिनंदन’च्या स्टाईलची तरुणांमध्ये क्रेझ

शुक्रवारी अभिनंदन यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाल्यानंतरही ‘अमूल’ने ‘अमूल गर्ल’ सिरीजमधील एक कार्टून पोस्ट करत त्यांचे स्वागत केले होते.

नक्की वाचा >> अभिनंदन पुन्हा कॉकपीटमध्ये जाणार का?, हवाई दल प्रमुख म्हणतात…

अनेकांनी ‘अमूल’च्या या ‘मूछ नही तो कुछ नाही’ ट्विटखाली अभिनंदन यांच्यासारखी मिशी ठेवल्याचे स्वत:चे फोटो ट्विट केले आहेत. अभिनंदन यांच्या शौर्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना मानणारा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तीमत्वाला भारदस्तपणा देणारी त्यांची मिशीही तरुणांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.

Story img Loader